‘यमाच्या गावाला जाऊ या’ देऊळगांवराजात प्रदर्शित Print

सोमनाथ सावळे , बुलढाणा
वास्तवतेवर आधारित, जागतिक आर्थिक मंदीवर भाष्य करणारा, विनोदी, उपहासात्मक व खळाळून हसायला लावणारा ‘यमाच्या गावाला जाऊ या’ हा मराठी चित्रपट उद्या, मंगळवार देऊळगांवराजाच्या बालाजी यात्रेत अभयराज टुरिंग टॉकीजमध्ये प्रदर्शित होत असल्याची माहिती या चित्रपटाचे निर्माते व कवी ज्ञानेश वाकूडकर यांनी लोकसत्ताला दिली. यावेळी युवा शेतकरी नेते रविकांत तुपकर, लखनभाऊ गाडेकर उपस्थित होते.
ज्ञानेश वाकूडकर म्हणाले की, हा भन्नाट देशी नृत्य व संगीतप्रधान विनोदी चित्रपट आहे. गार्गी मुव्हीजचा हा चित्रपट संकेत वाकूडकर यांनी दिग्दर्शित केला असून संगीत मिलिंद इंगळे यांचे आहे. कथा, पटकथा, संवाद व चित्रपट गीते ही त्यांची स्वत:ची असून छायाचित्रण चारूदत्त दुखंडे यांनी केले आहे. या चित्रपटात विजय चव्हाण, तेजा देवकर, मंगेश देसाई, सनीभूषण मुंगेकर, चारुशिला साबळे, राहुल लोहगांवकर, किशोरी अंबिये, कार्तिकी गायकवाड, पूर्णिमा अहिरे, मनोज टाकणे यांच्या भूमिका आहेत.
आर्थिक मंदीमुळे जागतिक कारखानदारी व व्यापारावर अरिष्ट आले. अशा वेळी बेकारी वाढली. आर्थिक संकटाचा स्वर्गात काय परिणाम होईल, याचा उहापोह या चित्रपटात केला आहे. बांधा वापरा व हस्तांतरित करा किंवा करार पध्दतीचा या चित्रपटात उपहास करण्यात आला आहे. नारदमुनींच्या मध्यस्थीने यमराज यमराज इंटरनॅशनल कंपनी स्थापन करतात. ही कंपनी स्वर्ग भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेते. ही कंपनी स्वर्गाचे नाव यमराज ग्लोबल व्हिलेज, अशी ठेवते. स्वर्गात प्रवेशासाठी पन्नास टक्के  व्यवस्थापन कोटा पक्का करण्यात येतो. स्वर्गात येण्यासाठी डॉक्टर व मोठे हॉस्पिटल यांना प्राधान्याने उपकंत्राट देण्यात येते. स्वर्गात नव्या अप्सरा भरती व सौंदर्यीकरणासाठी कंपनीला अधिकार देण्यात येतात, असे उपहास या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटातील ‘जहर खाऊ नका’ हे कार्तिकी गायकवाड हिने गायलेले गाणे अगोदरच लोकप्रिय झाले आहे. बुढ्ढी बुढय़ाला हाय म्हणते बुढीले बुढ्ढा नाय म्हणते, माझे नाजूक सुंदर वहिनी तुला शंभर शंभर बहिणी, अशी धम्माल गाणी यात आहेत. हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा असून शेतकरी समस्या, जंगली जनावरांचा प्रश्न, धरणग्रस्तांचा प्रश्न, शेतकरी आत्महत्या, या गंभीर प्रश्नांवर विनोदी पध्दतीने हसत खेळत भाष्य करणारा आहे. मनोरंजनातून समाज प्रबोधन हा या चित्रपटाचा उद्देश असल्याचे वाकूडकर यांनी सांगितले.