श्रेष्ठींकडून कानपिचक्या मिळताच राकाँच्या युवा पदाधिकाऱ्यांना जाग Print

प्रशांत देशमुख , वर्धा
विदर्भात पक्षसंघटना व प्रामुख्याने युवक कॉग्रेस कमकुवत असल्याबद्दल पक्षनेते अजितदादा पवार यांनी जाहीर कानपिचक्या देताच राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेश पदाधिकारी खडबडून जागे झाले आहेत. दरम्यान, पक्षाच्या युवक कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी विदर्भात वर्धा जिल्हा शाखेचे काम तुलनेचे चांगले असल्याचे प्रशस्तीपत्रक देत नवी जबाबदारी सोपविण्याचे संकेत दिले आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या राज्यस्तरीय मेळाव्यात मुंबईत व विदर्भात पक्षाची ताकद कमी असल्याबद्दल पक्षनेते शरद पवार व अजित पवार यांची चिंता दर्शविली होती. अजितदादा पवार यांनी तर विदर्भातील युवक कॉग्रेसच्या शाखेने अधिक काम करण्याची अपेक्षा व्यक्त करीत या शाखेच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्याही दिल्या. या ईशाऱ्याने हबकलेले युवक कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदय पाटील यांनी राज्यस्तरीय अधिवेशन आटोपल्यावर दुसऱ्यास दिवशी नागपूर गाठले.
नागपूरच्या विभागीय बैठकीत त्यांनी युवक नेत्यांना धारेवर धरले. मात्र याच बैठकीत त्यांना चंद्रपूर-गोंदियाच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारण्याचे धारिष्टय दाखविले. आपल्याच पक्षाचे मंत्री आम्हाला वेळ देत नाही. कामे करीत नाही. गृहित धरतात. मग आम्ही काय फ क्त हारेतुरे घेवून त्यांचे स्वागत करण्याचाच ठेका घेतला काय? असा प्रश्न एका जिल्हाध्यक्षाने थेट मांडला. त्यावर हडबडलेल्या प्रदेशाध्यक्षांनी ही बाब श्रेष्ठींच्या कानावर टाकण्याचे आश्वासन देत बोळवण केली.
अवघ्या दीड महिन्यापूर्वी प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झालेल्या उदय पाटील यांची नागपूर दौऱ्यातील भूमिका अनेकांना रूचली नसल्याचे समजले. एका जिल्हाध्यक्षास बैठकीस येण्यास केवळ दहा मिनिटे उशीर झाला म्हणून त्यास त्वरित राजीनामा देण्याचे फ र्मान सोडणाऱ्या पाटील यांच्या भूमिकेने सगळेच अचंबित झाले. नागपूरला येवून केवळ ना. अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर बराच वेळ फोटोसेशनमधे घालविणाऱ्या प्रदेशाध्यक्षांनी सामान्य कार्यकर्त्यांना किती वेळ दिला, हे तपासायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया नागपूरच्या एका संतप्त युवकनेत्याने दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या दालनात बसून हाजीहाजी करीत स्वत:पुरती पदे लाटणारे विदर्भात कशी संघटना मजबूत करणार असाही
प्रश्र उपस्थित केल्या जातो. युवक कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी संघटनापातळीवर केलेल्या कामांची विशेष दखल घेण्यात आली. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासह पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत स्वबळावर मिळविलेले यश कौतुकास्पद ठरले. आज जिल्हयात वर्धा विधानसभा क्षेत्रातील सेलू व वर्धा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद जेष्ठ नेत्यांऐवजी युवक शाखेकडे आहे. पचायत समितीचे उपसभापतीपद तसेच काही गावांचे सरपंच युवक काँग्रेसचे आहेत.
वर्धा जिल्हयाप्रमाणे काम विदर्भातील अन्य जिल्हयात होण्याची गरज व्यक्त करणाऱ्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी आता प्रत्येक जिल्हयातील युवक नेत्यांना कामाला लागण्याची सूचना केल्याचे समजले. प्रदेशाध्यक्ष उदय पाटील यासंदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, विदर्भात निश्चितच अधिक काम करण्याची गरज आहे. इतर भागाच्या तुलनेत विदर्भात आमच्या पक्षाचे आमदार, मंत्री कमी आहेत. त्यामुळे कामांना विलंब लागतो. पण अन्य मंत्र्यांचीही मदत यापूढे घेतल्या जाईल. राज्यात सर्वाधिक वेळ विदर्भास देऊ. युवती काँग्रेसचे मेळावे आटोपल्यावर खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत विदर्भात युवक काँग्रेसचे मेळावे घेण्याचे ठरले आहे. १ नोव्हेंबरपासून जिल्हाध्यक्षांच्या बैठकांना विभागवार सुरूवात करणार असून सर्व कार्यक्रमात विदर्भ अग्रक्रमावर ठेवण्याचे पक्के केले आहे. असा खुलासा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी प्रथमच करीत वर्धा जिल्हयात जिल्हा बॅकेच्या अध्यक्षपदासहबरीच पदं युवक शाखेकडे असल्याचे आवर्जुन नमूद केले. तर प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी श्रेष्ठींनी केलेल्या सुचना स्वागतार्ह असल्याचे म्हटले. २०१४ च्या निवडणुकांचे उद्दिष्टय देऊन अधिकाधिक युवकांना वेगवेगळया कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडण्याचे काम सुरू झाले आहे. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सुप्रिया सुळेंच्या सूचनेने वेगवेगळया उपक्रमाचे कक्ष स्थापन झाले आहेत, असेही समीर देशमुख म्हणाले. मात्र श्रेष्ठींनी दिलेल्या कानपिचक्यानंतरच युवक कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह विदर्भातील पदाधिकाऱ्यांना जाग आल्याचे दिसून आले.