फरारी प्रकाश पोहरे यांना अटक; सात दिवसांची पोलीस कोठडी Print

अकोला, नागपूर / प्रतिनिधी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

देशोन्नती वृत्तपत्र समुहाचे मालक व मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांना आज पहाटे कळमेश्वर पोलिसांनी अटक केली. गोंडखैरी युनिटमध्ये सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात अन्य सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रकाश पोहरे फरारी झाले होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांचा हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. आज पहाटे अकोला ते कौलखेड मार्गावरील पोहरे फार्म हाऊसमधून नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजन पाली, उपनिरीक्षक अरविंद सराफ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली. तेथून लगेचच त्यांना घेऊन पथक निघाले. दुपारी कळमेश्वर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडधिकाऱ्यांपुढे हजर केले. आरोपी प्रकाश पोहरे यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  
नागपूरच्या गोंडखैरी येथील ‘देशोन्नती’ वृत्तपत्र समूहाच्या प्रिंटिंग युनिटमध्ये गेल्या १३ ऑक्टोबरला प्रिटिंग युनिटमधील सुरक्षा कर्मचारी राजेंद्र कृष्णराव दुपारे याचा पोहरेंच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीने मृत्यू झाला होता. दुपारे हत्या प्रकरणानंतर नागपूर पोलिसांना चकमा देण्यात पोहरे सुमारे नऊ दिवस यशस्वी ठरले. या प्रकरणात कळमेश्वर पोलिसांनी प्रकाश पोहरे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारत अर्ज फेटाळला होता. यानंतर  प्रकाश पोहरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.
या प्रकरणात आज पुढील सुनावणी होणार होती. आज सकाळी येथे पोहरे यांच्या निवासस्थानी नागपूर पोलिसांनी धडक दिली. त्यावेळी त्यांना पोहरे येथून बार्शिटाकळी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कान्हेरी या गावात असलेल्या पोहरे फार्मवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
कळमेश्वर पोलीस व अकोला पोलिसांच्या पथकाने सकाळी कान्हेरी येथील फार्म हाऊसवर धडक दिली तेव्हा त्यांना प्रकाश पोहरे आढळले, अशी माहिती अकोला जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
दरम्यान, प्रकाश पोहरे यांना अटक झाल्याचे समजल्यानंतर त्यांचे जवळचे नातेवाईक माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. सुमारे अर्धा तास ते पोलीस अधीक्षकांसोबत बोलत होते. चर्चेचा तपशील समजला नसला तरी    पोहरेंना   अटक झाल्यानंतर त्यांची अधीक्षकांशी अर्धा तास भेट हा चर्चेचा विषय ठरला.

नाटय़मयरित्या अटक
पोलिसांनी प्रकाश पोहरे यांच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बंदच होता. पोहरे मुंबई, सोलापूर वगैरे पश्चिम महाराष्ट्रात  फिरून अकोल्यात परत आले. या दरम्यान, त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. उच्च न्यालयात अर्ज केल्याने पोलिसांनी शोध थांबवला, असल्याचे चित्र निर्माण केले. पोहरे ‘रिलॅक्स’ होऊन अकोल्यात परतले. पोलीस अकोल्यातील खबऱ्यांच्या संपर्कात होते. पोहरे अकोल्यात परतल्याचे समजताच ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक काल सायंकाळी अकोल्यात धडकले. त्यांच्या घरी पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर बस स्थानकासमोरील निशांत टॉवर्स तसेच छापखान्यात पोहरे यांचा शोध घेतला. या कारवाईदरम्यान पोहरे यांची काही माणसे पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती. पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आली. पोहरे न सापडल्याने निराश झाल्याचे दर्शवित हे पथक नागपूरकडे परतले. अकोल्यापासून काही किलोमीटर पोहरे यांच्या माणसांनी पोलिसांचा पाठलाग गेला. पोलीस खरोखरीच नागपूरला परत जात असल्याचे वाटल्याने ते परत फिरले.
पोलिसांचे पथक बायपासवरून माघारी फिरले. खामगावमार्गे हे पथक कौलखेडमधील पोहरे फार्म हाऊसजवळ पोहोचले. काही अंतर आधीच थांबून हे पथक फार्म हाऊसमध्ये शिरले. प्रकाश पोहरे त्यांच्या काही माणसांसह बोलत बसले होते. पोलिसांना पाहून पोहरे हादरलेच. या घटनेनंतर पोहरे यांनी त्यांचा तसेच कुटुंबातील सर्वांच्याच मोबाईलची सीम कार्ड अनेकवेळा बदलविले. प्रकाश पोहरे यांना अटक झाल्याचे समजताच खळबळ उडाली.