देऊळगांवराजा आणि अंढेरा भागात अवैध धंद्यांना ऊत Print

अवैध धंद्यामुळे जनजीवन धोक्यात
 बुलढाणा/प्रतिनिधी
देऊळगांवराजा व अंढेरा परिसरात पोलीस यंत्रणेच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांचे प्रस्थ प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. अवैध प्रवासी वाहतूक, रेती व गौण खनिजांची तस्करी, वरली मटका व जुगाराचे अड्डे, अवैध देशी-विदेशी दारूचा महापूर या बेकायदेशीर धंद्यांमुळे जनजीवन धोक्यात आले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात देऊळगावराजा व अंढेरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे करण्यात आली आहे.
देऊळगांवराजा व अंढेरा परिसरात काळीपिवळी व अ‍ॅपे टॅक्सीने प्रवासी वाहतूक करणारी दोनशेहून अधिक वाहने आहेत. त्याद्वारे दररोज विविध रस्त्यांवर सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. यासाठी पोलिसांकडून नियमित हप्ते गोळा करण्यात येतात. या परिसरात रेती, गौण खनिजांची प्रचंड तस्करी होत आहे. वरली मटका व जुगार अड्डय़ांना उधाण आले आहे. देऊळगावराजात अवैध धंद्यांनी कहर केला असतांना अंढेरा पोलिसांनीही कमाईसाठी आपले हस्तक महामार्गावर उतरविले आहेत. देऊळगांवराजा-चिखली मार्गावरील काळीपिवळीतून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहनांना अंढेरा पोलिसांना नियमित विशिष्ट रकमेचा हप्ता द्यावा लागतो. दररोज रात्री अंढेरा पोलीस ठाण्याचे विशिष्ट कर्मचारी त्यांच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर ओव्हर लोडिंगच्या नावावर प्रत्येक ट्रक व मालवाहतूक वाहनांकडून रकमा वसूल करतात. हा प्रकार रात्री अकरा वाजेपासून  सकाळपर्यंत चालू असतो. या सर्व प्रकाराची सखोल व गुप्त चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी  स्थानिकांनी केली आहे.