देवरीत वसतिगृहातील मुलाचा डायरियाने मृत्यू Print

गोंदिया / वार्ताहर
देवरीतील समाजकल्याण विभागाच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या बाप्पा समाजकल्याण वसतिगृहातील एका मुलाला डायरियाची लागण होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सातवीचा विद्यार्थी डेमेश्वर सोनकुकरा (१३) असे मृत मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डेमेश्वर हा गेल्या दोन दिवसांपासून आजारी होता, तसेच त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याची तपासणी करून त्याला औषध देण्यात आले होते, पण मंगळवारी सकाळी त्याचे मित्र त्याला नाश्त्याकरिता बोलावण्यास गेले असता त्यांना तो खाटेवरच मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती मुलांनी वसतिगृह अधीक्षकाला दिली.
डेमेश्वरला डायरियाची लागण झालेली असून त्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयातील डॉ. धुमनखेडे यांनी दिली आहे.