रोहयोतील गरव्यवहार रोखण्यासाठी आमगावात ‘ई-मस्टर’चा पहिला प्रयोग Print

गोंदिया / वार्ताहर
रोजगार हमी योजनेत बनावट मजूर दाखवून त्यांच्या मजुरीची उचल करणे, बोगस हजेरीपत्रक भरणे, संकेतस्थळावर मृत मजुरांची नावे टाकणे, या प्रकारामुळे या योजनेला चांगलेच गालबोट लागले होते. याला लगाम म्हणून यावर्षीपासून ‘मग्रारोहयो’ने ऑनलाईन संकल्पनेची कात टाकली. ही संपूर्ण योजना ‘ई-मस्टर’ या नावाने जोडण्यात आलेली असून कामावरील मजुरांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला व मूल्यमापन यातून वेळीच होणार आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर आमगाव तालुक्यात राबवण्यात येणार आहे. या यशानंतर ती अन्य तालुक्यात राबवण्याचा मानस असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.
शासनाच्या वेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही सर्व जुळवाजुळव होणार आहे. तसेच मजुरांच्या मजुरीच्या सूचना त्यासंबंधीची अधिकारी व कर्मचाऱ्यांची टिपणे या संकल्पनेतून साकार होणार आहेत. शिवाय, यावर्षीपासून गावपातळीवर राबवण्यात येणाऱ्या अनेक योजना रोहयोच्या छत्राखाली राबवण्यात येणार आहेत.
कृषी विभाग, पंचायत विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची कामेही या योजनेतून राबवण्यात येणार आहेत. हक्काचे काम मिळणार असल्याने मजुरांच्या चेहेऱ्यावर आनंद तरळत आहे. या योजनेचा पहिला टप्पा म्हणून योजनेंतर्गत २०११-१२ या आíथक वर्षांत जिल्ह्यातील ३ लाख २८४ कुटुंबांना १०० दिवस रोजगार मिळाला. त्यामुळे त्यांना हक्काची मजुरी देण्यास जिल्हा प्रशासन यशस्वी ठरले.
२०१२-१३ या वर्षांत ‘मग्रारोहयो’ योजनेत कमालीचे बदल केले गेले. यावेळी गावपातळीवर राबवण्यात येणारी सर्व योजना एकछत्राखाली जोडून त्या मग्रारोहयोत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी ठिकठिकाणी जनजागृती मेळावे, अधिकाऱ्यांच्या बठका व गावातील सरपंचांचे समन्वयन करण्यात आले.
ही योजना अधिक पारदर्शकपणे राबवण्यासाठी जॉब कार्डचे वितरण आणि जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच तहसील पातळीवर नियंत्रण कक्षही उघडण्यात आले. या योजनेचे पहिल्या टप्प्यातील यश म्हणून प्रत्यक्षात अकुशल कामावर ५८ हजार ४२४ कुटुंबांना काम मिळाले. पकी पूर्णवेळ १०० दिवसांची मजुरी म्हणून ३२८४ कुटुंबांना १०० दिवस काम देण्यात आले. यात आमगाव २८६, अर्जुनी-मोरगाव १७८, देवरी ४७८, गोंदिया ५२५, गोरेगाव ५३७, सडक-अर्जुनी ४२३, सालेकसा २३७ व तिरोडा तालुक्यातील ६२० कुटुंबांना रोजगार मिळाला.
या वर्षांपासून ‘मग्रारोहयो’त झालेल्या महत्त्वपूर्ण बदलामुळे काम मागणाऱ्या मजुरांची संख्या वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली.  ‘ई-मस्टर’ चे उल्लेखनीय कार्य म्हणजे मजुरांची ऑनलाईन हेराफेरी व खोटी बिले उचलण्याची भानगड या योजनेमुळे थांबणार आहे. त्यामुळे मजुरांना दिलासा मिळणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार आहे.