संत गाडगेबाबांच्या समाधीस्थळाच्या विकासाचा मुहूर्त अखेर गवसला Print

अमरावती / प्रतिनिधी
‘तीर्थी धोंडापाणी, देव रोकडा सज्जनी’ असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे संत गाडगेबाबा यांच्या वलगाव येथील दुर्लक्षित समाधीस्थळाचा कायापालट होण्याचा मुर्हूत अखेर सापडला आहे. हे समाधीस्थळ विकसित करण्यासाठी सुमारे ३७ कोटी ८६ लाख रुपयांच्या खर्चाला सरकारने अखेर मंजूरी दिली आहे.
महाराष्ट्रात लोकजागृती करणाऱ्या अग्रणी संतांपैकी एक असलेल्या गाडगेबाबा यांचे अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पेढी नदीच्या काठावर त्यांच्या वाहनातच २० डिसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले होते. त्यांचे समाधी मंदिर गाडगे नगर भागात उभारण्यात आले खरे, पण त्यांचे समाधीस्थळ मात्र दुर्लक्षित होते. एकाकी अवस्थेतील पुतळा तेवढा या समाधीस्थळाची ओळख सध्या देत आहे. या समाधीस्थळाचा विकास केला जावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती, पण त्याकडे सरकारने दुर्लक्ष चालवले होते.
अर्थमंत्र्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतेवेळी संत गाडगेबाबा यांच्या वलगाव येथील समाधीस्थळाचा विकास करण्याची घोषणा केली होती. मात्र निधीवाटप रखडले होते. विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत विविध विकास कामांचा आराखडा सरकारकडे सादर करण्यात आला होता. या सर्व कामांना ३७ कोटी ८६ लाख रुपये एवढा खर्च येणार असून अर्थ खात्याने नुकतीच या खर्चाला मंजुरी दिली आहे.
संत गाडगेबाबा यांच्या समाधीस्थळाच्या विकासासोबतच वलगाव येथील अंतर्गत रस्ते आणि इतर सुधारणा देखील केल्या जाणार आहेत. समाधीस्थळाजवळ पूर प्रतिबंधक भिंत, बांधाची दुरुस्ती आणि घाटाचे बांधकाम केले जाणार आहे. याशिवाय वलगाव येथील बस स्थानकाचे बांधकाम आणि इतर विकास कामे केली जाणार आहेत.
समाधीस्थळावर संत गाडगेबाबा यांचा कास्य पुतळा बसवण्यात येणार आहे. पुतळयासाठी इमारत बांधली जाणार आहे. समाधीस्थळ परिसराभोवती संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. या ठिकाणी पोहचण्यासाठी डांबरी पोचमार्ग, उद्यान, सध्या अस्तित्वात असलेल्या वृद्धाश्रमाच्या खोल्यांची दुरूस्ती, समाधीस्थळाच्या बाजुला ध्यान केंद्राची इमारत, भक्त निवास, म्यूझियम आणि व्यायामशाळा उभारली जाणार आहे. शिवाय वलगाव येथील स्मशानभूमीचा विकास याच निधीतून केला जाणार आहे. वलगाव येथील अंतर्गत रस्त्यांचा विकास काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्राला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. त्यांच्या नावे राज्यात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे, पण त्यांचे समाधीस्थळ मात्र आजपर्यंत दुर्लक्षित होते. पेढी नदीकाठच्या या समाधीस्थळाला अलिकडच्या काही वर्षांत पुराचा तडाखा देखील बसला होता. या ठिकाणी एक वृद्धाश्रम आहे, त्याकडेही सरकारचे दुर्लक्ष होते. सरकारने घोषणा करूनही या समाधीस्थळाच्या विकासासाठी मुहूर्त सापडलेला नव्हता, आता सरकारने खर्चासाठी मंजूरी दिल्याने या परिसराचा विकास होईल आणि संत गाडगेबाबा यांच्या अनुयायांना लवकरच समाधीस्थळाचा विकास झालेला पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.