झुडपातील ‘त्या’ चिमुकलीसाठी तिचे वडीलच सरसावले Print

यवतमाळ / वार्ताहर
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील सुलभ शौचालयाजवळील झुडपात चार दिवसांची जिवंत मुलगी एका कापडात गुंडाळून असल्याचे आढळून आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर त्या मुलीचे जन्मदाते म्हणवणाऱ्या वडिलांनी यवतमाळ पोलिसांक डे धाव घेऊन आपबिती सांगितली. पंजाब खांदवे, असे या मुलीच्या वडिलांचे नाव आहे.
पशुचिकित्सक असलेल्या पंजाब खांदवे यांच्या पत्नीचे नाव कविता आहे. या दाम्पत्याला प्रतीक्षा आणि वृक्षा अशा दोन मुली आहेत. पंजाबची पत्नी कविता मानसिक रुग्ण आहे. तिची प्रसूती दिग्रसच्या एका खाजगी रुग्णालयात झाली. यानंतर चार दिवसांनी कविताने आपल्या नवजात मुलीला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील सुलभ शौचालयाजवळील झुडपात फेकून दिले होते. ज्या कापडात मुलगी गुंडाळलेली आढळली त्या कापडावर दिग्रसच्या एका खाजगी रुग्णालयाचे नाव छापलेले होते. यवतमाळ पोलीस आरोपी मातेचा शोघ घेत असतानाच पंजाब खांदवे यांनी पोलिसांना आपबिती सांगितली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. हा प्रकार शिवसेनेचे कार्यकत्रे संतोष ढवळे यांनी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. किशोर इंगोले यांनी तेव्हा त्या मुलीला उपचारासाठी दाखल केले. चार दिवसांच्या त्या मुलीची प्रकृती उत्तम असल्याचे समजते.