४८ औषध विक्रेत्यांना नोटिसा, १९ निलंबित Print

गोंदिया / वार्ताहर
बनावटी औषधे, मुदतबाह्य़ औषधे व बंधनकारक औषधांची विक्री करणे या संदर्भात औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत विविध प्रकरणात जिल्ह्य़ातील ४८ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस, तर १९ विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रकारे एका विक्रेत्याचा परवानाही रद्द करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त मंडलेकर यांनी दिली.
नियमबाह्य़ औषध विक्री करणे, मुदतबाह्य़, बंधनकारक औषध विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्य़ातील ७०० औषध विक्री दुकानांपकी जवळपास ५४३ दुकानांची तपासणी केली. यात एमपीटी कायद्यांतर्गत ३०० दुकानांची तपासणी करण्यात आली.
यात १० दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, तर सहा औषध विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कोडीनयुक्त औषध विक्रीअंतर्गत ७२ दुकानांची तपासणी करण्यात आली.
यापकी १५ दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून चार दुकानदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  गोंदियाच्या सिव्हिल लाईनमधील विनय मेडिकल एजंसीचा परवाना रद्द करण्यात आला.
फार्मासिस्ट संदर्भात १७१ दुकानांची तपासणी करण्यात आली असून यातील २३ दुकानदारांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे. नऊ दुकानदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.   एकंदरीत गोंदिया जिल्ह्य़ात ४८ औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई एप्रिल ते सप्टेंबर २०१२ पर्यंतची आहे.