लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन Print

सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवण्याची संस्थेची अखंडित परंपरा
यवतमाळ/वार्ताहर
लोकमान्य टिळकांच्या नावाच्या वारशाला जपत आजवरच्या धुरंधरांनी निर्माण केलेल्या प्रेरक वाटेवर मार्गरत असणारे लोकमान्य टिळक महाविद्यालय म्हणजे या परिसरातील एक महनीय संस्था आहे. केवळ उपजीविकेचे साधनरूप पदवी न देता क्रीडा, संस्कृतीसह सर्वच क्षेत्रात लौकिकप्राप्त, सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याची या संस्थेची अखंडित परंपरा असून आज सुवर्ण महोत्सवाच्या टप्प्यावर यापुढेही अशीच समाजघडण ही संस्था करेल, अशी आशा पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांनी व्यक्त केली.
या महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनंतराव देशपांडे, आमदार वामनराव कासावार, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. रमाकांत देशपांडे, सचिव अ‍ॅड. महेश देशपांडे, संचालक नरेंद्र नगरवाला व प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वले उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव अ‍ॅड. महेश देशपांडे यांनी केले. स्वागताध्यक्ष संचालक नरेंद्र नगरवाला यांनी भाषण स्वातंत्र्याच्या अतिरेकाचा नेमका उल्लेख करीत संस्कार संपन्न पिढीच्या निर्मितीसाठीच्या संस्थेच्या प्रयासाला अधोरेखित केले. याप्रसंगी संस्थेचे माजी संचालक शरद चौधरी, सुभाषराव देशमुख, रमेश अणे, अनिल जयस्वाल, प्रा. अरविंद गोरंटीवार, बालाजी काकडे, मुलचंद जैन, बलकी, रमेश बोहरा यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार कासावार यांनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना शैक्षणिक अनिवार्यतेचे महत्व स्पष्ट केले. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनंतराव देशपांडे यांनी आपला सत्कार हा आजवर संस्थेच्या जडणघडणीत हातभार लावणाऱ्यांचा सत्कार आहे, असे नमूद करीत संस्थेच्या दैदीप्यमान वाटचालीचा मागोवा घेतला. व्यासपीठावर उपस्थित ८ पैकी ७ जण या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी वा प्राध्यापक होते, याची नोंद प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वले यांनी घेऊन आभार मानले. प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांच्या खुमासदार व शायरीसंपन्न सूत्रसंचालनाने कार्यक्रमात बहार आणली.
कार्यक्रमाच्या अंती प्रा. राजेंद्र कोठारी निर्मित व मयूर गेडाम दिग्दर्शित आनंद बोथले, आशिष पोटे, श्वेता नासरे, मोनाली राजूरकर, पूजा क्षीरसागर, पूजा मुत्यलवार, पल्लवी तुराणकर, अक्षय देशपांडे, हर्शिता तेलंग यांनी वाघ्यामुरळी नृत्य सादर केले, तर मंच संचालनात माधुरी वैद्य, सोनाली पोटे, एकता गौरकार, पूजा डावे, सीमा आसवाणी, अक्षय देशपांडे, कल्पेश कोटेचा, अमोल बावणे यांनी विशेष सहाय्य केले. आमदार वामनराव कासावारांनी दिलेल्या १५ लाखाच्या निधीतून व्यायाम साहित्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला वणीचे उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी लोखंडे, आय.डी.बी.आय बँकेचे संचालक गोखले इत्यादी गणमान्य नागरिक, तसेच संस्थेच्या आजी-माजी संचालकांसह अनेक वणीकर उपस्थित होते.