समस्यांवर मात करण्याची संघात ताकद -संजय बिर्ला Print

बुलढाणा/प्रतिनिधी
सामाजिक व राष्ट्रीय समस्यांचे आव्हान पेलून त्यावर मात करण्याची ताकद राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे. संघाचे कार्य हे संघ शाखेच्या माध्यमातून राष्ट्राच्या परम वैभवासाठीच आहे, असे प्रतिपादन जळगांव जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व सहकार भारतीचे प्रदेशाध्यक्ष संजय बिर्ला यांनी केले. देऊळगांवराजा येथील संघशाखेच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.
देऊळगावराजा येथील किल्ला शाखेच्या मैदानावर या कार्यक्रमात मंचावर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष गोंविंदराव झोरे, तसेच नगर संघचालक छबुराव भावसार विराजमान होते. प्रारंभी अतिथींच्या हस्ते शस्त्रपूजन झाले. स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. प्रास्ताविक, परिचय, स्वागत व आभार नगर संघचालक छबुराव भावसार यांनी केले.  
बिर्ला म्हणाले की, डॉ. हेडगेवार यांनी १९२५ ला विजयादशमीच्या दिवशी छोटय़ा मुलांना सोबत घेऊन संघकार्यास प्रारंभ केला. त्यामुळे विजयादशमी हा संघाचा वर्धापन दिन ठरतो. आज संघाला विश्वव्यापी स्वरूप प्राप्त झाले आहे. आज संघ शाखेत एखाद वेळेस संख्या कमी दिसेल, परंतु एक तासाच्या संघ शाखेतून राष्ट्रीय संस्कार प्राप्त करून उरलेले २३ तास समाजात वावरतांना ते संस्कार स्वयंसेवकांनी आचरणात आणून निरनिराळ्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
शिस्तबध्द कार्यक्रम म्हणजे संघ, राष्ट्रीय आपत्तीमध्ये सर्वप्रथम धावून येणारा संघ, असे गणितच बनले आहे. यामुळे सत्प्रवृत्ती जागृत करण्याच्या विजयादशमीच्या पावनपर्वावर सर्वानी अधिकाधिक योगदान देण्याचा संकल्प करावा. प्रमुख पाहुणे म्हणाले की, सर्व समाज संघमय होण्यासाठीकाही चांगले बदल केले पाहिजे. संघ ही काळाची गरज असून, संघ हे विश्वातील  अजोड संघटन असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.