बालवैज्ञानिकांच्या प्रकल्पाची राज्य परिषदेसाठी निवड Print

भंडारा / वार्ताहर
‘ऊर्जा,शोध,संरक्षण आणि संवर्धन' या विषयावर राष्ट्रीय बालविज्ञान परिषद-२०१२ साठी स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयातील बालवैज्ञानिकांच्या एका चमूने ‘शालेय विद्यार्थ्यांच्या ऊर्जावापराचा आकृतीबंध' यावर अभ्यास केला. या प्रकल्पाची निवड धुळे येथे होऊ घातलेल्या राज्यस्तरीय परिषदेत सादरीकरणासाठी झालेली आहे.
या शाळेच्या विद्यार्थी गटाने ‘माध्यमिक शाळकरी विद्यार्थ्यांच्या ऊर्जावापराचा आकृतीबंध लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा सूक्ष्म अभ्यास' या शीर्षकाखालील प्रकल्पावर जुलै २०१२ पासून कार्य केले असून काढलेले निष्कर्ष प्रकल्प अहवाल रूपाने १९ ऑक्टोबरला भंडारा येथे झालेल्या जिल्हा पातळीवरील बाल वैज्ञानिक परिषदेत सादर केले. शालेय विद्यार्थी त्यांच्या दैनंदिन शालेय कार्यामध्ये विविध प्रकारे ऊर्जेचा वापर करतात, असे आढळले. यात स्नायू ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, इलेक्ट्रीक ऊर्जा, इ.ऊर्जेचा वापर होत असल्याचे निरीक्षण नोंदवून विविध प्रकारच्या ऊर्जा वापराचे प्रारूप निश्चित केले आहे.
या प्रकल्पासाठी शिक्षक हेमराज टिचकुले यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्पकर्त्यांमध्ये चिन्मय नवलाखे, भूपेंद्र झंझाडे आणि कशिश साकोरे या माध्यमिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
२०१२ हे सर्वासाठी निरंतर ऊर्जेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करण्याच्या युनोच्या घोषणेसह राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या ऊर्जा विषय, ऊर्जा व त्याबद्दलच्या जागृतीसाठी अतिशय महत्वाचा ठरतो आहे.