अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी देशमुख ; उपाध्यक्षपदी साबळे बिनविरोध Print

अमरावती/प्रतिनिधी
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी त्यांच्याच गटाचे अनंत साबळे  यांचीही बिनविरोध निवड झाली. या दोन्ही पदांसाठी गुरुवारी निवडणुक झाली होती.
जिल्ह्य़ातील सहकार क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेवर बबलू देशमुख यांच्या गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची ही निवडणूक या गटासाठी फारशी कठीण राहणार नाही, अशी अटकळ होती. विरोधकांनीही ताणून न धरता देशमुख यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. बबलू देशमुख आणि अनंत साबळे यांच्याखेरीज अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी कुणाचेही उमेदवारी अर्ज न आल्याने उपविभागीय अधिकारी मोहन पातूरकर यांनी या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. बबलू देशमुख यांची बँकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. अनंत साबळे हे देखील उपाध्यक्ष राहिले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. बँकेचे मावळते अध्यक्ष प्रकाश काळबांडे, उपाध्यक्ष जयप्रकाश पटेल, नितीन हिवसे, सुभाष पावडे, प्रवीण काशीकर, दयाराम काळे, अनुराधा वऱ्हाडे, उत्तरा जगताप, संजय वानखडे, सुधाकर भारसाकळे, सुरेश साबळे, बाळासाहेब अलोणे, बंडू देशमुख, सुरेश महल्ले, बाळासाहेब निमकर उपस्थित होते. आमदार वीरेंद्र जगताप आणि बबलू देशमुख यांच्या समर्थकांनी बँकेच्या परिसरात मोठी गर्दी केली होती.
जिल्हा बँकेच्या राजकारणावर अमरावती जिल्हा परिषदेतील सत्ताकारणाचा मोठा प्रभाव असून ही बँक आपल्या ताब्यात असावी, यासाठी राजकारणातील विविध गट सक्रीय असताना बँकेवर पकड निर्माण करण्यात बबलू देशमुख यांना यश मिळाले होते, पण नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीत बबलू देशमुख यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले बबलू देशमुख यांच्या हाती जिल्हा बँकेची धुरा आली असली तरी जिल्हा परिषदेत मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेससोबत सामना करावा लागत असल्याने आगामी काळात कुरघोडीचे राजकारण पहायला मिळेल, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आहे.     

‘शेतकरी हिताचेच निर्णय घेणार’
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. शेतकऱ्यांचा या बँकेवर विश्वास आहे. या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही. शेतकरी हिताचेच निर्णय घेतले जातील. कर्मचाऱ्यांनीही शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी सजग राहिले पाहिजे. बँकेचे प्रशासन गतीमान करणे आणि कारभारात सुधारणा करण्यास आपले प्राधान्य राहणार आहे, असे बबलू देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.