गोंदिया जिल्ह्य़ात ग्रामीण भागातील भारनियमन ११ वरून ४ तासांवर Print

शेतकऱ्यांना दिलासा, पिकांना मिळणार जीवदान
गोंदिया/ वार्ताहर
जिल्ह्य़ातील धानपीक ऐन भरीस असताना महावितरणकडून सुरू असलेल्या ११ तासांच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र परसवाडा परिसरातील नागरिकांनी याविरुद्ध आवाज उठविला. अखेर हे भारनियमन साडेचार  तासांवर आणण्याचे आदेश देण्यात आले.
धानपिकाला सध्या पाण्याची अत्यंत गरज असताना महावितरण कंपनीकडून सकाळी ६ पासून सायंकाळपर्यंत ११ तासांचे भारनियमन केले जात होते. तिरोडा तालुक्यात हा प्रश्न गंभीर झाला होता. भारनियमनामुळे शेतातील धानाला पाणी देणे शेतकऱ्यांना अशक्य होऊन पीक उभे करपण्याची भीती निर्माण झाली होती. आठवडाभरापूर्वी परसवाडा परिसरातील नागरिकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेऊन वीज कंपनीच्या कार्यालयावर ठिय्या दिला, तसेच जिल्हा परिषद सदस्य डॉ. योगेंद्र भगत यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांची भंडारा येथे भेट घेऊन त्यांना या समस्येचे गांभिर्य सांगितले होते. मुळक यांनी महावितरणच्या संचालकांना याबाबत आदेश देऊन भारनियमन कमी करण्यास सांगितले होते, मात्र विजेची तूट आणि वीज बिलाची वसुली होत नसल्याचे कारण देत महावितरणकडून टाळाटाळ केली जात होती.
जिल्हा परिषद सदस्य डॉ. योगेंद्र भगत यांनी हा विषय सातत्याने लावून धरला. आमदार डॉ.खुशाल बोपचे यांनीही मुंबईत ऊर्जामंत्र्यांना निवेदन देऊन भारनियमन कमी करण्याची मागणी केली होती. अखेर महावितरणने नमते घेत भारनियमन साडेचार तासांवर आणण्याचे मान्य करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. याबद्दल तिरोडा परिसरातील शेतकऱ्यांकडून ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे आभार व्यक्त करण्यात आले.