न्यायाधीशांनी बोलावे कमी, ऐकावे अधिक Print

विद्युत कंपनीचे लोकपाल न्या. रोही यांचा सल्ला
वर्धा / प्रतिनिधी
न्यायाधिशांनी बोलावे कमी व ऐकावे अधिक त्यामुळे त्यांचीच कार्यक्षमता वाढते व न्यायदानाचे काम सोपे होते, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व विद्युत कंपनीचे विद्यमान लोकपाल के.जे.रोही यांनी यशवंत महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्रात बोलताना दिला.
महाविद्यालयाच्या विधी विभागातफै  सायबर लॉ या विषयावर आयोजित या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश शिवणकर, यशवंतचे उपाध्यक्ष सतीश राऊत तसेच प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांची उपस्थिती होती.
‘सायबर लॉ’ याविषयी बोलतांना न्या.रोही म्हणाले, सायबर लॉ तंत्रज्ञानाशी निगडीत आहे. ते खऱ्या अर्थाने जनसामान्यांपर्यंत पोहोचलेला नाही. तांत्रिक भाषा ही एक अडचण असू शकते. म्हणून सोप्या भाषेत तो सर्वाना अवगत करण्याचे काम करावे लागेल. संगणकाने झालेल्या क्रांतीचा व्यवहारी उपयोग कसा करायचा, हे आपल्याच हाती आहे. राज्यघटनेचा कधीही विसर पडू देऊ नये, असे न्या.रोही यांनी सांगितले.
डॉ. विलास सपकाळ म्हणाले, तंत्रज्ञानाच्या बळावर सर्वच क्षेत्रात आपण प्रचंड प्रगती केली. मात्र तंत्रज्ञानाचा वापर करताना बुध्दी, ज्ञान व सामंजस्य याचा समन्वय साधला तरच आपण प्रगल्भ होऊ. समन्वय बिघडला तर विनाश अटळ आहे. सायबर गुन्हे विश्वावर अंकुश लावायचा असेल तर स्वत:ची अशी यंत्रणा विकसित करणे अपेक्षित आहे. बुध्दीवान लोकांकडे हे काम सोपवावे. असे डॉ. सपकाळ यांनी नमूद केले.
अ‍ॅड. अशोक पावडे यांनी कायदा केवळ वकील किंवा न्यायाधिश यांच्याच ज्ञानावर अवलंबून नसून तंत्रज्ञ, अभियंते, शास्त्रज्ञ यांचाही सहभाग आता महत्वाचा ठरल्याचे प्रतिपादन केले. आयोजक संस्थेचे संस्थापक दाआजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्य घेण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा याप्रसंगी सतीश राऊत यांनी सादर केला.
प्राचार्य डॉ. देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर दोन सत्रातील चर्चासत्रास प्रारंभ झाला. डॉ.अंजली हस्तक, डॉ. जयंत अपराजित, डॉ. उषाश्री गुहा व डॉ. आय.जे.राव यांनी परीक्षण केले. विविध तज्ञांनी शोधप्रबंध सादर केले. सूत्रसंचालन डॉ. रविशंकर मोर, प्रा. क्षिप्रा सिंगम व अजित सदावर्ते यांनी केले. चर्चा  सत्रात राज्यभरातील विधितज्ञ व अभ्यासक प्रतिनिधी सहभागी झाले होते.