दोन आजी-माजी आमदारांमध्ये पेटले वाक्युद्ध Print

रावसाहेब शेखावत यांचा आता डॉ. सुनील देशमुखांवर पलटवार
 अमरावती / प्रतिनिधी
अमरावती शहराचा खुंटलेला विकास आणि बकालपणाच्या मुद्यावर माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यावर शरसंधान केल्यानंतर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील घोटाळा डॉ. देशमुखांच्या कार्यकाळातच झाल्याचा प्रत्यारोप शेखावत यांनी केल्याने शहराच्या या दोन आजी-माजी आमदारांमध्ये आता वाक्युद्ध पेटले आहे.
अमरावती शहरात एकात्मिक रस्ते विकास योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामांची दुरवस्था, महापालिकेवर आलेले आर्थिक आरिष्टय़, साफसफाईकडे होत असलेले दुर्लक्ष, अशा अनेक प्रश्नांसदर्भात माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. आमदार रावसाहेब शेखावत यांचे नाव न घेता त्यांच्या कार्यपद्धतीविषयी डॉ. देशमुख यांनी पत्रात टीका केली होती. रावसाहेब शेखावत यांनी अखेर मौन सोडून एका पत्रकार परिषदेत डॉ. देशमुख यांच्यावर प्रत्यारोप केले.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळात घोटाळा झाला तेव्हा डॉ. सुनील देशमुख हेच मंत्री होते. या प्रकरणात ४५ अभियंते निलंबित झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची शासन स्तरावर चौकशी सुरू आहे. भ्रष्टाचार झाला हे लवकरच समोर येईल, असा आरोप रावसाहेब शेखावत यांनी केला. अमरावती शहरासाठी एकात्मिक रस्ते विकास योजना मंजूर झाली तेव्हा ११४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. ही योजना ४० कोटी रुपयांनी कशी वाढली, रस्ते आणि उड्डाणपूल बांधल्यावर नागरिकांना टोल द्यावा लागेल, हे त्यांनी का सांगितले नाही, असा सवाल रावसाहेब शेखावत यांनी केला आहे.
एकात्मिक रस्ते विकास योजनेसाठी कर्ज घेण्यात आले, पण या बाबतीत अमरावतीकरांना अंधारात ठेवण्यात आले. उड्डाणपूल, रस्ते, चौकांचे सौंदर्यीकरण या कामांची देखभाल आणि दुरुस्ती ही टोलच्या माध्यमातून येणाऱ्या रकमेतून केली जाईल, असा करार डॉ. देशमुख यांनी केला. स्वत:ला विकास पुरुष म्हणून मिरवले, पण तब्बल ३० वर्षांसाठी टोलद्वारे जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे षडयंत्र त्यांनीच रचले, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे डॉ. देशमुख यांना द्यावी लागणार आहेत, असे रावसाहेब शेखावत यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे डॉ. देशमुख यांनी रावसाहेब शेखावत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. एकात्मिक रस्ते विकास योजनेच्या खर्चातील वाढ ही नैसर्गिक वाढ आहे. कोणत्याही योजनेच्या किमतीत दरवर्षी १० टक्के वाढ होतच असते. ज्याला गणिताचे ज्ञान आहे, त्याला देखील हे कळते, असा टोला त्यांनी लगावला आहे. एकात्मिक रस्ते विकास योजनेच्या कामात लपवाछपवी केल्याचे शेखावत यांचे म्हणणे दिशाभूल करणारे आहे. याविषयी यापूर्वीच आपण सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. सुमारे ७५० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांचे श्रेय घेऊन जी माहिती दिली जात आहे, या रस्त्यासाठी देखील टोल लागणार आहे, असे डॉ. देशमुख यांचे म्हणणे आहे.  डॉ. देशमुख यांनी शहरातील विविध प्रश्नांसदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेच, शिवाय जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांची भेट घेऊन त्यांना देखील निवेदन सादर केले. महापालिका निवडणुकीनंतर बराच काळ शांत असलेल्या डॉ. देशमुख यांनी रावसाहेब शेखावत यांना आता लक्ष्य केले आहे. शेखावत यांनीही आता त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवला आहे. विधानसभा निवडणुकीला अद्याप अवकाश असला, तरी राजकीय गोळाफेकीला मात्र अमरावतीत जोरदार सुरुवात झाली आहे.