माना टेकडी परिसरातील बिबटय़ा अखेर जेरबंद Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
माना टेकडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबटय़ाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. गुरुवारी माना टेकडी परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
लालपेठ व माना टेकडी परिसरात दुचाकीस्वार व नागरिकांवर बिबटय़ाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून घडत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बिबटय़ाला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती, परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही मागणी गांभीर्याने घेतल्याचे दिसत नव्हते.
अखेर दोन दिवसांपूर्वी एका बकरीची शिकार केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास बिबटय़ाने बालकावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर वनविभागात एकच खळबळ उडाली. नांदगाव, लालपेठ कॉलरी, माना व माना टेकडी परिसरात चार पिंजरे लावण्यात आले, तसेच मोकळय़ा मैदानात जिवंत बकरी बांधण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास माना टेकडी परिसरातील पिंजऱ्यात अकेर बिबट जेरबंद झाला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. वृत्तलिहिस्तोवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून बिबटय़ाची तपासणी करणे सुरू होते. बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे उपवनसंरक्षक कल्याणकुमार, परिविक्षाधीन अधिकारी मीनू सोमराज, वनपाल बोबडे, वनरक्षक कुळमेथे, मेश्राम, सहारे, मानद वन्यजीव रक्षक व इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, प्रशांत मुंजनकर, निखिल झाडे, संदीप गोवर्धन, निलेश डोहाळकर, निशांत चहांदे यांच्यासह इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.