पाणी महाराष्ट्राचे अन् धरण मात्र आंध्रात Print

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची अद्याप बैठकच नाही
गडचिरोली/वार्ताहर, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

वर्धा-पैनगंगा नदीच्या संगमाजवळ प्राणहिता नदीवर आंध्रप्रदेशच्या सीमेत चवेला-श्रवंती या धरणाला आंध्रप्रदेश व महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे; परंतु या धरणाचा महाराष्ट्रातील जनतेला कोणताही फायदा होणार नसल्याने या धरणाला गडचिरोलीवासीयांकडून विरोध होत आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चार आमदारांची समिती गठीत केलेली आहे; परंतु आतापर्यंत एकदाही या समितीची बैठक झालेली नाही. तरी या समितीची बैठक त्वरित बोलावण्यात यावी, अशी मागणी अहेरीचे आमदार दीपक आत्राम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री दिवं. वाय.एस. राजशेखर रेड्डी यांनी ३१ जानेवारी २००७ ला चवेला-श्रवंती प्रकल्पाची घोषणा केली होती. हा प्रकल्प वर्धा-वैनगंगा नदीच्या संगमापुढे प्राणहिता नदीवर आंध्रप्रदेशच्या सीमेत तुमडी हेटी येथे होत आहे. या प्रकल्पाचा केवळ आंध्रप्रदेशालाच सिंचनासाठी लाभ होणार आहे, तर गडचिरोली जिल्ह्य़ातील चार्मोशी, अहेरी आणि सिरोंचा या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीचे व पिण्याचे पाणी पळविले जाणार आहे. शिवाय, २० ते २२ गावांचे पुनर्वसन करावे लागणार असून अहेरी क्षेत्रातील गावांना विस्थापित होण्याची पाळी ओढवणार आहे. चवेला धरण ज्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे त्या परिसरात राष्ट्रीय दर्जाचे चपराळा अभयारण्य आहे. त्यामुळे या अभयारण्यातील उच्च प्रतिचे सागवान व इतर मौल्यवान वनसंपत्ती, वन्यप्राणी व पक्षीसुद्धा नष्ट होण्याची भीती आहे, तसेच चपराळा येथील प्रशांत धामात कार्तिकस्वामी महाराजांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. या तीर्थक्षेत्रालाही धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या मंजुरीपासूनच जिल्ह्य़ातील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी प्रकल्पाच्या उभारणीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या निर्मिती संदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्य़ातील या प्रकल्पबाधित क्षेत्रातील चार आमदारांची एक समिती दोन महिन्यांपूर्वी गठित करण्यात आली होती. या समितीत अहेरीचे आमदार दीपक आत्राम, गडचिरोलीचे आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आरमोरीचे आमदार आनंदराव गेडाम आणि राजुराचे आमदार सुभाष धोटे या चौघांचा समावेश आहे.