शिक्षकांच्या वाहनाला नगरजवळ अपघात; १ ठार, तिघे जखमी Print

वर्धा / प्रतिनिधी
गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली देवदर्शनाला निघालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या वाहनाला नगरजवळ झालेल्या अपघातात एक मुख्याध्यापक ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले.
अपघातात ठार झालेल्या मुख्याध्यापकांचे नाव संजय घायवट (जामणी-सेलू) असे असून त्यांचा मृतदेह आज सकाळी वर्धेला आणण्यात आला. सलग चार दिवस आलेल्या सुट्टय़ांची संधी साधून ही मंडळी शिर्डी, पंढरपूर व अन्य ठिकाणी सहलीवर गेली होती. पंढरपूरला विठोबाचे दर्शन घेऊन शिक्षक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले. नगरजवळ रस्त्यातील दरडीला गाडीची धडक बसल्याने गाडी चार वेळा उलटली. त्यात सेलू तालुक्यातील जामणीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक संजय घायवट जागीच ठार झाले. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या अपघातानंतर चांगल्या स्थितीत असलेल्या काहींनी रस्त्यावरील जाणाऱ्या वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला, पण मदत मिळाली नाही. शेवटी आज पहाटे एक रुग्णवाहिका पोहोचल्यावर सगळ्यांना नगरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी वध्र्याचे गट शिक्षणाधिकारी दीपक साने, शिक्षक संजय वैरागडे (आकोली), विवेक महाकाळकर (तळेगाव) व पुरुषोत्तम सावरकर (गिरोली) यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र आज प्रकृती गंभीर झाल्याने दीपक माने व सावरकर यांना पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकांवर कोसळलेल्या या आपत्तीची शहरभर दु:खद अंत:करणाने चर्चा होत होती.