विद्यार्थ्यांनो, गणिताशी मत्री करा -विनोद अग्रवाल Print

गोंदिया / वार्ताहर
गणित हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक कुटुंबात गणित विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विज्ञानाला गणिताची जोड नसती तर मानवाने एवढी प्रगती साधली नसती. विद्यार्थ्यांनी गणित विषयाची अभिरुची राखल्यास त्यांना प्रगतीचे शिखर गाठता येते. यासाठी गणिताशी मत्री करा, असे आवाहन गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण व आरोग्य सभापती विनोद अग्रवाल यांनी केले.
गोंदिया जिल्हा गणित अध्यापक मंडळाद्वारे भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त विनायकराव कोतवाल स्मृती सभागृहात आयोजित जिल्हा गणित अध्यापकांच्या संमेलनात ते बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन विनोद अग्रवाल यांनी केले. अध्यक्षस्थानी यशवंत सरुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष विकास पाटील, सूर्यकांत बाजड, नागपूरच्या मोहता सायन्स महाविद्यालयाचे माजी प्रा. डॉ. अनंत व्यवहारे, पुण्याच्या अभ्यास मंडळाचे सदस्य आर. एन. येवले, औरंगाबादचे पुरुषोत्तम शर्मा व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हा संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
गणिताची विविधांगे स्पष्ट करीत उच्च व तार्किक विचार करण्यास भाग पाडणारे मार्गदर्शन डॉ. व्यवहारे यांनी केले. तसेच गणित विषयाला शिक्षक हा अंतर्मुख व हसरा असावा, असे मनोरंजनात्मक व लाघवी भाषेत मार्गदर्शन करताना शिक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवले. आपल्या मनोरंजनात्मक शैलीत त्यांनी गणित विषयाची महती विषद केली. पुरुषोत्तम शर्मा यांनी ज्ञान, रचना, वादात्मक उपयोजनकौशल्यावर प्रकाश टाकत अध्यापकांना कृतिशील व निर्णायक बनण्याचे आवाहन केले. याप्रसंगी ओमप्रकाशसिंह पवार यांच्याद्वारे ‘संपादि शाश्वत’ या स्मरणिकेचे प्रकाशन विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्य.) राघवेंद्र मुनघाटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर, हिंगणघाटचे यादव, जिल्हा संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष राजकिशोरसिंह चव्हाण उपस्थित होते. सुनील श्रीवास्तव व बबिता भारद्वाज यांनी उपस्थितांचे आभार मानले.