‘बहुभाषिक होणे गरज असली तरी मातृभाषेकडे दुर्लक्ष नको’ Print

नवव्या मराठा साहित्य संमेलनाचे सूप वाजले
चंद्रपूर / प्रतिनिधी
बहुभाषिक होणे ही काळाची गरज असली तरी मातृभाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मातृभाषा ही मानवी मनासाठी अंगावरचे दूध आहे. मातृभाषेतून साहित्याची निर्मिती करून घराघरात साहित्य नेण्याचा संकल्प सोडत नवव्या मराठा साहित्य संमेलनाचे सूप वाजले. चांदा क्लब ग्राऊंड येथे महात्मा जोतिबा फुले साहित्य नगरीत आयोजित ९ व्या मराठा साहित्य संमेलनाचा समारोप संमेलनाध्यक्ष बाबा भांड, डॉ. आ. ह. साळुंखे, पुरुषोत्तम खेडेकर, प्रभाकर पावडे, डॉ. अशोक जिवतोडे, उपमहापौर संदीप आवारी, परशुराम धोटे, जैमिनी कडू, अशोक राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. तत्पूर्वी, काल शनिवारी मध्यरात्री उशिरापर्यंत  कविसंमेलन झाले. राज्यातील विविध भागांतून संमेलनात सहभागी झालेल्या कवींनी यात सहभाग घेतला.  तीन दिवसांच्या या संमेलनात काल दिवसभर तीन परिसंवाद व साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांची प्रकट मुलाखत झाली. यानंतर रात्री उशिरा आठ वाजता समारोपीय कार्यक्रमाला सुरुवात झाली.  समारोपीय भाषणात अध्यक्ष बाबा भांड यांनी मातृभाषेसोबतच बहुभाषिक होणे काळाजी गरज आहे. सांस्कृतिक वास्तवास पचवून वैश्विक जाणिवांशी नाते जोडणारे नवे वाङ्मयीन आविष्कार कसे करता येतील, याचे चिंतन करा. भाषा ही सांघिक ओळख देणारी घटना आहे. त्यामुळे मातृभाषेतून साहित्याची निर्मिती करून घराघरात साहित्य पोहोचविण्याचा संकल्प या वेळी एकत्र आलेल्या सर्व वक्त्यांनी सोडला. प्रास्ताविक दिलीप चौधरी यांनी केले.