विदर्भस्तरीय सामाजिक जाणीव पुरस्कार सुनील खोब्रागडेंना प्रदान Print

गडचिरोली / वार्ताहर
दैनिक ‘जनतेचा महानायक’चे मुख्य संपादक सुनील खोब्रागडे यांना या वर्षीचा विदर्भस्तरीय सामाजिक जाणीव पुरस्कार केमिस्ट भवनात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला. येथील केशवराव बारसागडे स्मृती प्रतिष्ठान व स्पर्श संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते होते. प्रमुख अतिथी चिखलीचे अधिव्याख्याता व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवींद्र साळवे उपस्थित होते.
गौतम बुद्धाचे पंचशील हे जीवनाचे अधिष्ठान असून आंबेडकरी विचारधारा हा आपल्या जगण्याचा आधार आहे. आंबेडकरी समुदाय आज अक्षरदृष्टय़ा बऱ्याच अंशी साक्षर झाला असला तरीही आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत तो अजूनही निरक्षरच आहे. त्यामुळे आपण आंबेडकरी समुदायात आर्थिक साक्षरता रुजविण्यासाठी कायम प्रयत्नशील असतो, असे सुनील खोब्रागडे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. खोब्रागडे यांचे कार्य चळवळीची गती वाढवण्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वास या वेळी डॉ. इरपाते यांनी व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत यांनी आंबेडकरी समुदायातील सुशिक्षित व बुद्धिवादी व्यक्तींनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या सुनील खोब्रागडेंचा आदर्श गिरवावा, असे आवाहन केले. स्पर्शचे अध्यक्ष प्रा. दिलीप बारसागडे यांनी तरुणांनी जाणीवपूर्वक सामाजिक कार्य केल्यास ही स्थिती निश्चितच बदलेल, असा आशावाद व्यक्त केला. सुनील खोब्रागडे यांना दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी १० व १२ वी तील गुणवत्ताप्राप्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक केशवराव बारसागडे स्मृती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुरेखा खोब्रागडे यांनी केले. संचालन फुलचंद खोब्रागडे यांनी केले. गौतम मेश्राम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.