सेंद्रीय खताच्या नावाखाली राख विकण्याचा धंदा Print

बुलढाणा/प्रतिनिधी
सेंद्रीय खताच्या नावाखाली राख विकण्याचा गोरखधंदा २७ ऑक्टोबर रोजी  रात्री पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ही धाडशी कारवाई खामगाव येथील प्रभारी डिवायएसपी उत्तम जाधव यांच्या पथकाने केली. या पथकाने चितोडा शिवारातून सेंद्रीय खताच्या पिशव्यांमध्ये भरलेल्या राखेचे ३१८ पोते जप्त केले असून तिघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. सदरची राख सेंद्रीय खताच्या पिशवीमध्ये भरून सेंद्रीय खत म्हणून विकल्या जात होती.
खामगाव तालुक्यातील चितोडा शिवारामध्ये सेंद्रीय खताच्या नावाखाली पिशव्यामध्ये राख भरून विकल्या जात असल्याची गोपनीय माहिती प्रभारी डीवायएसपी उत्तमराव जाधव यांना मिळताच डीबी स्क्वॉडचे हरपालसिंग राजपूत यांच्यासह पोलिसांनी चितोडा शिवारामध्ये रात्री ९ वाजताच्या सुमारास छापा मारला. यावेळी बायो पॉवर सेंद्रीय भूसुधारक हा ट्रेड मार्क असलेल्या पिशव्यांमध्ये राख भरलेली मिळून आली आणि या पिशव्या सीलबंद करून विक्रीसाठी बाजारात नेण्याचा काही लोकांचा डावा होता. मात्र, पोलिसांनी टाकलेल्या अचानक छाप्यामुळे त्यांचा डाव फसला.
या सेंद्रीय खताच्या पिशवीवर बायो वर्ल्ड अ‍ॅग्रो कंपनी अमरावती रोड, नागपूर असा कंपनीचा पत्ता छापलेला असून ४५० रूपये किंमतही छापण्यात आली आहे. राखेने भरलेल्या एकूण ३१८ पिशव्या पोलिसांनी जप्त केल्या असून चितोडा शिवारात सध्या पारखेड रहिवाशी असलेले अरुण जामा हिवराळे यांच्या पडीत जमिनीमध्ये हा गोरखधंदा सुरू होता.
याबाबत एका जागरूक शेतकऱ्याने पोलिसांना माहिती देताना कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना जी मोफत जैविक खते पुरविली जातात. ती सुध्दा याच कंपनीची असल्याचे सांगितले. त्यामुळे आता पोलिसांच्या संशयाची सुई कृषी खात्याकडेही वळली आहे.
या प्रकरणामध्ये चितोडा येथील गजानन उन्हाळे, शे. शौकात, रियाज खान या तिघांना पोलिसांनी संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सेंद्रीय खताच्या नावाखाली राख विकणारे लोक राखीचा ट्रक एखाद्या निर्जन स्थळी खाली करतात आणि नंतर ही राख सेंद्रीय खताच्या पिशव्यामध्ये भरून ती सीलबंद करतात तसेच सौदा पूर्ण झाल्यानंतर हे लोक आपली व्यवसायाची जागा ताबडतोब बदलत राहतात. असाही अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. अशा प्रकारे खताच्या नावाखाली राख विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक या ठिकाणी करण्यात येत होती. शेती पेरण्यासाठी शेतकऱ्यांना व्याजाने पैसे काढावे लागतात आणि ज्या खताच्या भरवश्यावर शेतकरी चांगल्या पिकांची आशा करतो त्या ठिकाणी असा प्रकार होत असेल तर शेतकऱ्यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे अशा बनावटी खत निर्माण करणाऱ्यांवर विकणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भावना एका शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
या कारवाईमध्ये प्रभारी डीवायएसपी उत्तम जाधव, डीवायएसपी (प्रशिक्षणार्थी) राहुल मदने, ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश बोडखे, एएसआय संजय चिटवार, हरपालसिंग राजपूत, भास्कर तायडे, कपाटे, मनोज चव्हाण, कैलास चव्हाण, गोलवाल, वानखडे, राजपूत, विल्हेकर, ग्रामीण पोलिसचे सोलाट , जाधव यांच्यासह शहर व ग्रामीण पोस्टेचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.