गुप्तधनासाठी मांडूळ सापांची तस्करी Print

मुंबईतील टोळी नांदुऱ्यात गजाआड
बुलढाणा / प्रतिनिधी
गुप्तधन शोधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांडूळ जातीच्या सापांच्या तस्करीचे प्रमाण राज्यात वाढले आहे. अलिकडेच मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्या मुंबईच्या सहा जणांना नांदुरा पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून इनोव्हा कारसह साप जप्त करण्यात आले. नांदुरा पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी वनखात्याकडे सुपूर्द केले आहे.
नांदुरा पोलिसांना जळगाव जामोद मार्गावरील येरळी गावाजवळ एक इनोव्हा कार (क्र. एमएच ०२ सीआर २०२९) संशयास्पदरित्या आढळून आली. पोलिसांनी ही कार थांबवून झडती घेतली असता या कारमध्ये मांडूळ जातीचे अंदाजे दोन किलो वजनाचे व चार फूट लांबीचे दोन साप आढळून आले. या कारमधील शोयब महंमद सिद्दिकी शहलिया (४५), अब्दुल रज्जाक महमंद सिद्दिकी शहलिया (५७), शिवनाथ रामधर जयस्वाल (५३), उदय नारायण सक्सेना (२६, सर्व रा.मुंबई) यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम व वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. नांदुरा पोलिसांनी हे प्रकरण जळगाव जामोदच्या वन परिक्षेत्राधिकाऱ्यांकडे तपासासाठी पाठविले आहे.
बुलढाणा जिल्ह्य़ातून मुंबई व इतर भागात मांडूळ सापाची तस्करी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शेगाव रेल्वेस्थानकावर मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले होते. बुलढाणा जिल्ह्य़ातील पूर्णा नदीकाठ व सातपुडा डोंगरदऱ्यातील नदी नाल्यामध्ये मांडूळ जातीचे साप मोठय़ा प्रमाणावर आढळतात. हे साप दोन तोंडे असण्यासारखे दिसतात. गुप्तधन शोधण्यासाठी या सापांचा वापर करतात. त्यामुळे  या सापांना प्रचंड प्रमाणावर मागणी असते. त्यासाठी हे साप शोधणाऱ्या टोळया जिल्ह्य़ात फिरत असल्याची माहिती वनखात्याच्या सूत्रांनी दिली.