‘एकाच पिढीकडून सारे प्रश्न सुटत नसतात’ Print

चंद्रपूर / प्रतिनिधी  
एका पिढी कडून कधीही संपुर्ण प्रश्न सुटत नसतात प्रत्येक पिढीतील लोकांनी पुढाकार घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आज आपण जास्तीत जास्त निकोप, शोषण विरहित व सदृढ समाज शिवधर्माच्या माध्यमातून निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. ९ व्या मराठा साहित्य संमेलनात महात्मा जोतिबा फुले साहित्य परिसर चांदा क्लब मैदानात आयोजित प्रकट मुलाखती दरम्यान धर्माच्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले, धर्माची भूमिका ही न्याय देणारी असावी, माणसाच माणूसपण जपणारी असावी. एकाच जातीचा धर्म या शिवधर्माविषयी लोकांत असलेल्या गैरसमजाविषयी बोलताना डॉ. साळुंखे म्हणाले भारतामध्ये अनेक महापुरुषांविषयी गैरसमज जाणीवपूर्वक पसरवण्यात आले आहेत, जर का त्यांच्याबाबत असे होत असेल तर तुम्ही-आम्ही सामान्य माणसे आहोत. आपल्या बाबतीतही तसेच गैरसमज पसरवण्यात आले आहेत. बौध्द धर्माचा पर्याय असताना शिवधर्म या स्वतंत्र धर्माची स्थापना का करण्यात आली? याविषयी साळुंखे म्हणाले, आपल्या लोकांनी खऱ्या अर्थाने बुध्दाला समजूनच घेतलेले नसल्याने तो इतरांना समजावा हा माझा प्रयत्न होता, जर बौध्द धर्माचा पर्याय स्वीकारला असता तर बौध्द बांधवांव्यतिरिक्त कुणीही या गोष्टीला समजून घेतले नसते. परिणामी शिवधर्माचा पर्याय निवडण्यात आला. त्यांनी या मुलाखतीत आपला लेखन प्रवासातील विविध टप्पे श्रोत्यांना सांगितले, तसेच वाचकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. समतावादी चळवळीला यशस्वी करण्याकरीता साहित्यीकांनी उत्तम प्रकारे उपयोग करावा, असेही ते म्हणाले. चंद्रशेखर शिखरे व गंगाधर बनबरे यांनी ही मुलाखत घेतली.
बडोदा संस्थानात सव्वाशे वर्षांपूर्वी समतावादी विचारांचा उगम सयाजी शिंदेंच्या काळात झाला होता, आदर्शवादी राज्य तेव्हा निर्माण करण्याचा प्रयत्न महाराजानी केला होता मात्र इतिहासात त्याची दखल पाहिजे त्या प्रमाणात घेण्यात आली नाही ही शोकांतिका आहे. अशा प्रकारचा अन्याय टाळायचा असेल तर आता आपण लिहिते झालो पाहिजे, असे मत समारोपीय भाषणात संमेलनाध्यक्ष बाबा भांड यांनी व्यक्त केले. आपण शाहू, फुलेंचे नाव किती दिवस घेणार? असा सवाल करतानाच आता नवीन लोकांनी पुढे येऊन समाज हिताचे प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी उत्तम दर्जाची साहित्य निर्मिती होणे गरजेचे आहे. साहित्यात खूप मोठी ताकद असते, याचे भान साहित्यिकांनी ठेवले पाहिजे, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या अ‍ॅड. एकनाथ साळवे, जमादास खोब्रागडे, आचार्य ना गो थुटे, आचार्य टी. टी. जुलमे, डॉ सरताज बानो काजी, उषाकिरण आत्राम, मनोज बोबडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा अशोक राणा, डॉ साहेब खंदारे, कामाजी पवार, प्रताप भोयर, प्रदीप सोळंके, मनोज आखरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाची समारोपीय भूमिका दिलीप चौधरी यांनी मांडली तर संचालन संजय कोंडेकर यांनी केले. आभार राजेंद्र पवार यांनी मानले.