अमरावती-नरखेड मार्गावरून धावली पहिली प्रवासी रेल्वे Print

इंदूर-यशवंतपूर एक्स्प्रेसचे अमरावती जिल्ह्य़ात जोरदार स्वागत
अमरावती / प्रतिनिधी
इंदूर-यशवंतपूर या नवीन एक्स्प्रेस रेल्वे गाडीचे सोमवारी अमरावती जिल्ह्य़ात चांदूर बाजार आणि नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले. अमरावती-नरखेड या रेल्वेमार्गावरून पहिली प्रवासी रेल्वेगाडी आज धावली. अनेक अडथळ्यांमधून मार्ग काढत सुरू झालेल्या या गाडीच्या स्वागतासाठी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रावसाहेब शेखावत, अभिजीत अडसूळ, रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रेल्वे स्थानकांवर जमले होते.
रविवारी सायंकाळी इंदूर रेल्वे स्थानकावरून सुटलेली ही साप्ताहिक एक्स्प्रेस चांदूर बाजार येथे थांबणार नाही, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. खासदार आनंदराव अडसूळ यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून या रेल्वेगाडीला चांदूर बाजार येथे थांबा मिळवण्यात यश मिळवले. चांदूर बाजार रेल्वे स्थानकावर ही गाडी पोहोचताच शिवसैनिकांनी आनंदराव अडसूळ यांचे अभिनंदन केले. अडसूळ यांनी चांदूर बाजार ते नवीन अमरावती रेल्वे स्थानकापर्यंत याच गाडीतून प्रवासही केला.
आधी ही गाडी दुसरीकडे वळवली जाणार होती. रेल्वे अंदाजपत्रकात या रेल्वेची घोषणा झाली असतानाही नरखेड-अमरावतीमार्गे ही गाडी चालवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोणतीही तयारी केली नव्हती. दिवाळीपूर्वी ही गाडी नरखेडमार्गे सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा आनंदराव अडसूळ यांनी दिला होता. चांदूर बाजार येथे या गाडीला थांबा देण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. आज सकाळी ही गाडी चांदूर बाजारला पोहोचल्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी गाडीचे स्वागत केले. या वेळी शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दिनेश वानखडे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे, तालुका प्रमुख आशीष सहारे, अमर सोनार, विभागीय रेल्वे उपयोगकर्ता समितीचे सदस्य सुनील भालेराव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवाशांचे स्वागत केले.
नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर याच रेल्वे गाडीतून पोहोचल्यानंतर खासदार अडसूळ यांनी हिरवी झेंडी दाखवून ही गाडी पुढे रवाना केली. या वेळी आमदार रावसाहेब शेखावत, रवी राणा, अभिजीत अडसूळ यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिक यावेळी जमले होते.