आंध्रातून आलेला ६ लाखाचा २५ पोती गुटखा जप्त Print

यवतमाळ/वार्ताहर
alt

आंध्रप्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्य़ातून अमरावतीकडे जात असलेल्या ६ लाख रुपयांचा २५ पोती गुटखा अन्न व औषधी प्रशासन विभाग व पांढरकवडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आला.
राज्यात गुटखा बंदी असली तरी यवतमाळ जिल्ह्य़ात गुटखा विक्री खुलेआम सुरूहोती. अन्न व औषधी प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांच्या जिल्ह्य़ातच गुटख्याची अवैध विक्री होत असल्याने अन्न व औषधी प्रशासन विभागही अस्वस्थ होते.
यवतमाळ जिल्हा आंध्रप्रदेशच्या आदिलाबाद जिल्ह्य़ाला लागून असल्याने व त्या ठिकाणी गुटखा बंदी नसल्याने आंध्रप्रदेशातून मोठय़ा प्रमाणात यवतमाळ व इतर जिल्ह्य़ात गुटखा जाऊ लागला. काल आदिलाबादवरून टॅक्सी वाहनाने ( एमएच२७/ एक्स ३२९५ ) लाखांचा गुटखा अमरावतीक डे निघाल्याचे पांढरकवडा पोलिसांना समजले. त्यांनी त्वरित या मार्गावर सापळा रचला. बराच वेळ वाट पाहिल्यावर संशयास्पद गाडी येताना दिसली.
पोलिसांनी त्वरित धाव घेऊन गाडी अडविली. त्यात २५ पोती गुटखा आढळून आला. त्याचे बाजारभावाप्रमाणे मूल्य ६ लाख रुपये आहे. पोलिसांनी वाहनचालक देवेन जनार्दन रावल यांना अटक केली. यापूर्वीही देवेनने मोठय़ा प्रमाणात गुटखा याच वाहनातून अमरावतीला पोहोचविला होता.