बुलढाणा जिल्ह्य़ात आतापासूनच तीव्र पाणीटंचाई Print

रब्बी पिकांनंतर आता खरीपालाही फटका, जिल्हा प्रशासन ढिम्म
सोमनाथ सावळे , बुलढाणा
alt

रब्बी पिकानंतर पाऊस अवर्षणाचा आता खरीप हंगामाला जबरदस्त फटका बसत आहे. रब्बी हंगामाचे पेरणी क्षेत्र सत्तर टक्के घटले असून यंदा हिवाळ्यातच जिल्हाभर तीव्र पाणीटंचाईची बोंबाबोंब सुरू झाली आहे. जिल्ह्य़ातील सुमारे एक हजार गावांना पाणी टंचाई ग्रासणार असून या संदर्भात जिल्हा प्रशासन कुठलेही ठोस नियोजन व उपाययोजना करतांना दिसत नाही.
या वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्य़ातील खामगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर या तीन तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित १० तालुक्यात अतिशय कमी पाऊस पडल्याने तेथील जलस्त्रोताची पाणी पातळी खालावली आहे. या १० तालुक्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत ४० टक्के  एवढी प्रचंड घट झाली. पाऊस दमदार व नियमित नसल्याने अवर्षणाचा खरीप पिकाला चांगलाच फटका बसला. खरीप पिकाचे उत्पादन ४० टक्के  घटले आहे. रब्बी पिकांच्या पेरणी क्षेत्रात ७० टक्के  घट झाली आहे. गव्हाच्या पेरा क्षेत्रात ९० टक्के घट होणार आहे. खामगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर या तीन तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा दहा टक्के पाऊस जास्त झाला, मात्र दहा तालुक्यात तो ४० टक्क्यांनी घटला. पर्यावरणीय व पर्जन्यमानाच्या असंतुलनामुळे पाऊस अवर्षण व टंचाईच्या भीषण विळख्यात हे दहा तालुके सापडले आहेत.
पाऊस अवर्षणाचा दोन्ही हंगामांना फटका बसला असतांनाच जिल्ह्य़ातील सुमारे १२ तालुक्यातील भूजल पातळीत लक्षणीय म्हणजे दोन ते अडीच मीटरने घट झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. बुलढाणा व चिखली (२.२१ मीटर), देऊळगाव राजा (२.४८ मीटर), नांदुरा (२.११ मीटर) या तालुक्यातील भूजल पातळी आगामी काळासाठी धोक्याची पूर्वसूचना देणारी आहे. शेगाव, संग्रामपूर व खामगाव या तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य सर्व तालुक्यात अशीच परिस्थिती आहे. हे लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आतापासूनच पाणी टंचाईचे नियोजन व उपाययोजनांना गती देण्याची आवश्यकता असताना जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने या भीषण पाणी टंचाईच्या संदर्भात प्राथमिक सविस्तर अहवाल राज्य शासनास पाठविण्याची आवश्यकता असतांना तो अद्यापही राज्य शासनास गेला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार जिल्ह्य़ातील ऐंशी टक्के  सिंचन प्रकल्प, जलाशय व पाणी स्त्रोत पाणी पुरवठा करण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे जिल्ह्य़ातील एक हजार गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट आतापासूनच घोंगावत आहे. याकडे गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.