मुंडेंचा अकोला दौरा रद्द? Print

पक्षांतर्गत कलहाची किनार
अकोला/प्रतिनिधी
alt

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी गोपीनाथ मुंडे यांचा अकोल्याचा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाली. येत्या ५ नोव्हेंबर रोजी ते अकोल्यात येणार होते, पण त्यांचा दौरा रद्द झाल्याने भाजपमध्ये उलटसुलट चर्चाना पेव फुटले. अकोल्यात बंडखोरांचे बंड थोपविण्यासाठी हा दौरा रद्द झाल्याची चर्चा भाजप वर्तुळात होती. नागपूर येथे ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रस्तावित शेतकरी मोर्चाची तयारी अकोल्यात वेगाने सुरू झाली.
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी झाल्यानंतर पत्रकार परिषदेत गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबादनंतर अकोल्यात जाहीर सभा घेण्याची घोषणा केली होती. मुंडे महाराष्ट्र प्रभारी झाल्यानंतर येथील बंडखोरांनी मुंबईत त्यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाची व्यूहरचना आखली, पण स्थानिक भाजपच्या नेत्यांनी बंडखोरांना थंड करण्यासाठी जोरदार तयारी केल्याची माहिती पुढे आली आहे. या तयारीतूनच मुंडे यांचा अकोल्यातील नियोजित दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, बंडखोरांच्या गटाने हा दौरा होणारच नव्हता, असा प्रचार खासगीत सुरू केला आहे. विदर्भात अकोल्यात झालेल्या बंडखोरीने पक्षाची महापालिकेत सत्ता आली नाही. याची सर्वाधिक ओरड आता पक्षात होत आहे. त्यामुळे या बंडखोरांना थंड करण्याचे जोरदार प्रयत्न पक्षात होत आहेत.
विदर्भात भाजपची स्थिती चांगली असल्याने येथील परिस्थितीत विनाकारण गालबोट लागू नये, असे पक्षातील ज्येष्ठांना वाटते. त्यामुळेच हा दौरा रद्द झाल्याचा दुसरा मतप्रवाह पक्षात आहे. विदर्भापेक्षा मराठवाडय़ात पक्ष विस्तारासाठी श्रेष्ठींनी लक्ष द्यावे लागेल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला. पूर्तीच्या संचालकांना पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथे ३१ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा निघणार आहे. या मोर्चात भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी म्हणून सहभागी व्हावे, यासाठी जोरदार तयारी पक्षाने स्थानिक पातळीवर सुरू केली. या संदर्भात पक्ष कार्यालयात आज महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती पुढे आली. अकोल्यातून काही शेतकरी नागपूर येथील एका वर्तमानपत्राच्या कार्यालयावर मोर्चात सहभागी होतील, असे मत सूत्रांनी व्यक्त केले, पण याला अधिकृत पुष्टी मिळाली नाही.
अकोल्यातील शेतकऱ्यांचे नागपूर येथील मोर्चात काय काम, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला. नागपूर येथे होणाऱ्या प्रस्तावित शेतकरी मोर्चात किती लोक अकोल्यातून सहभागी होतात, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. भाजपच्या अंतर्गत गोटात याविषयी जोरदार खलबते सुरू आहेत, अशीही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.