संक्षिप्त Print

प्रा. डॉ. दत्तु शिंदे यांना आचार्य पदवी
वाशीम/वार्ताहर
येथील ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार  बाबाराव मुसळे यांच्या साहित्यावर हिंगणघाट येथील प्रा. डॉ. दत्तू शिंदे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नुकतीच आचार्य पदवी प्रदान केली आहे. ‘बाबाराव मुसळे ; व्यक्ती आणि वाड्मय’ या विषयावर त्यांनी डॉ.गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला. यापूर्वी बाबाराव मुसळे यांच्या साहित्यावर विदर्भातील इतर समकालीन साहित्यिकांच्या साहित्य कृतीसह तौलनिक अभ्यास करून अकोल्याचे डॉ. शिवाजी नागरे आणि सिंदखेडराजा येथील डॉ. डोईफोडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवीने सन्मानित केले होते.  

सहायक निबंधकाला मच्छिमारांचा घेराव
प्रतिनिधी / चंद्रपूर  
सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथील मच्छिमारांनी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वाखाली येथील प्रशासकीय भवनात सहायक संस्था निबंधकाला घेराव केला. मिनघरी मच्छीमार संस्था हडप करण्यासाठी काही जणांचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठीच या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही संपूर्ण कृती अन्यायकारक असल्याचे सांगत शंभरावर मच्छिमारांनी घेराव केल्याने एकच खळबळ उडाली. मच्छिमारीचा व्यवसाय करून कुटुंबाचे संगोपन करणारे गावातील मच्छिमार यामुळे संतापले आहेत. सहायक निबंधक नोटीस पाठवून मच्छिमारांना धमकावत असल्याचा आरोपही केला आहे.    

शेषानंद पांडे महाराज यांना समाजरत्न पुरस्कार
चंद्रपूर / प्रतिनिधी
भद्रावती येथील आदिनाथ गुरू माऊली सेवामंडळाचे संस्थापक संत ब्रम्हमूर्ती शेषानंद पांडे महाराज यांचा समाजरत्न पुरस्कार, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर खासदार अडसुळ, कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष सुरेश हिरे, आमदार रवी राणा, सुरेश पाठक, सुभाष तेटवार, देविदास धामनकर, प्रा. डॉ. संजय साळीवकर, श्रीराम कोल्हे, सतिश गावंडे, अरुण पोहनकर, प्रभा भागवत, संदा पोहनकर, दिनेश टेंभरे, पंजाबराव काकडे, देविदास काळकर, प्रल्हाद कोल्हे उपस्थित होते. या सत्कार सोहळय़ाप्रसंगी बोलताना ब्रम्हमूर्ती शेषानंद महाराज यांनी हा सत्कार माझा नसून समस्त कुंभार समाजाचा आहे, असे सांगितले.