‘जिल्ह्य़ाची पीक आणेवारी ५० पैशांच्या आत काढा’ Print

बुलढाणा / प्रतिनिधी
दुष्काळी परिस्थिती असल्याने पीक आणेवारी ५० पैशांच्या आत काढण्यात यावी व सोयाबीनला ५ हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा, अशी मागणी आमदार विजयराज शिंदे यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी दिलेल्या निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी केली. या निवेदनानुसार या जिल्ह्य़ात ८४.८ मि.मी. पाऊस झाला असून, कोणताही प्रकल्प यावर्षी भरलेला नाही. नाले, विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत. जिल्ह्य़ात काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण एवढे अत्यल्प आहे की, आतापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. अत्यल्प पावसामुळे पिकांची परिस्थितीही जेमतेम आहे. यावर्षी सोयाबीनला कमी पावसाचा फटका बसल्यामुळे झडीत कमी आले आहे. शेतकऱ्यांजवळ पैसा नसल्याने मिळालेल्या भावात सोयाबीन विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने आताच सोयाबीनला ५ हजार रुपये प्रती क्विंटल हमी भाव जाहीर करावा, तसेच कमी पावसाने प्रत्येक पिकाची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. त्यातच नजर आणेवारी ५० पैशांच्या वर काढून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जिल्ह्य़ाची पीक आणेवारी ५० पैशांच्या आत आहे, परंतु शासनाच्या दबावाला बळी पडून प्रशासन ५० पैशावर आणेवारी काढते. त्यामुळे अंतिम आणेवारी काढतांना ५० पैशांच्या वर जाऊ नये, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.