टीपेश्वर अभयारण्य जतन करण्याचे आवाहन Print

वार्ताहर / यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्य़ातील केळापूर तालुक्यात असलेले टीपेश्वर अभयारण्य विदर्भातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील वनविभागाचा मौलिक ठेवा आहे. तो आपण जतन करून ठेवला पाहिजे. पांढरकवडा वनविभागाचे फार मोठे वनक्षेत्र टीपेश्वर अभयारण्यात आहे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक ए.पी. गिऱ्हेपुंजे यांनी केले आहे. पांढरकवडा वनविभाग आणि टीपेश्वर अभयारण्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वन्यजीव सप्ताहानिमित्त समारोपीय कार्यक्रमाच्या अघ्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सहायक वनसंरक्षक सातपुते यांनी अहवाल वाचन केले. सेवानिवृत्त वनसंरक्षक राजन टोगो यांनी मेळघाटच्या जंगलातील प्राणीसंपदेची माहिती दिली. वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धामध्ये यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. वनरक्षक पुलेनवार अश्विन राठोड तानवा लोखंडे यांनी पाटणबोरी वनक्षेत्रात एका वाघाची तो जाळ्यात अडकला असताना सुटका केली होती. त्याबद्दल त्याचा तसेच पक्षीतज्ज्ञ प्रा. रमजान विराणी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. धर्मेंद्र तेलगोटे, प्राचार्य भागानगरकर, अमर सिडाम, मडघणे, शेख आणि वनरक्षक मोहदे यांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले.