दोनशेहून अधिक प्राणीमात्रांना जीवदान Print

भंडारा /वार्ताहर
लाखनी येथील ग्रीनफ्रेंडस संस्थेने गेल्या आठ वर्षांत २०० हून अधिक पशुपक्षी, सरपटणारे प्राण्यांना जीवदान देऊन पर्यावरण रक्षणाचे मोलाचे काम केले आहे. नुकतेच लाखनी-सिपेवाडा मार्गावर एका शेतात चार फूट लांब, पोटात अंडे असल्यामुळे वजन वाढलेली मादी घोरपड ग्रीनफ्रेंडसच्या विद्यार्थी सदस्यांना आढळली. सर्पमित्र पंकज भिवगडे, सचिन गिऱ्हेपुंजे, अक्षय निर्वाण, सचिन निर्वाण व पिंटू वेलखोडे यांनी तिला ताब्यात घेतली. या दरम्यान बऱ्याच नागरिकांनी दोन-तीन हजार रुपयात घोरपडीची मागणी केली. आमिषाला बळी न पडता विद्यार्थ्यांनी घोरपड ग्रीनफ्रेंडसचे संघटक प्रा. अशोक गायधने यांना सुपूर्द केली. वनविभागाच्या सहकार्याने या घोरपडीला जंगलात सोडण्यात आले. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने गडेगाव येथील वनकार्यालयात यांनी वनविभाग ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब, अखिल भारतीय अंधश्रद्धा  निर्मूलन तालुका समिती लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्पमित्र मेळाव्यात प्रा.अशोक गायधने यांनी चार्ट व छायाचित्रांच्या मदतीने साप व वन्यजीवांबद्दल प्रबोधन केले. तसेच संबंधित नियम व कायद्यांची माहिती दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी सचिन्द्रप्रताप सिंह, जिल्हा उपवनसंरक्षक यशबीर सिंह, वाईल्ड लाईफ वार्डन राजकमल जोब, तसेच वनविकास महामंडळाचे व्यवस्थापक एन.डी. चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.