पीकविम्यासाठी शेतकरी अखेर पोलीस ठाण्यात Print

वार्ताहर यवतमाळ
इतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडून मदत मिळत असल्याचे समजताच नापिकीने खचलेले व कर्जबाजारी झालेले शेतकरी बँकेत पोहोचले, पण त्यांनी बँकेत जमा केलेला पीक विम्याचा हप्ता बँकेने संबंधित विमा कंपनीकडे जमाच केला नसल्याने त्यांनी नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच नाही, असे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगताच हे शेतकरी चांगलेच हादरले. शेवटी त्यांनी पोलिसात धाव घेतली.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत हा प्रकार उघडकीस आल्यावर चौकशी करून बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांनी महागाव शाखेचे बँक व्यवस्थापक सी.आर. मांडवगडे, रोखपाल एन.पी. जाधवांसह व्ही.सी. जाधव, जांभुळकर, व्ही.आर. आडे या कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. महागावातील या शेतकऱ्यांना पीक विमाची नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईची रक्कम बँकेने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.