सहकारी बॅंकांचा आयकरविषयक प्रश्न सुटणार Print

वाशीम/वार्ताहर
राज्यातील नागरी, सहकारी बॅंकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच दिल्ली येथे राज्यातील नागरी सहकारी बॅंकांच्या शिष्टमंडळाची, अर्थ खात्याचे केंद्र सचिव अधिकाऱ्यांबरोबर बठक पार पडली. यात नागरी सहकारी बॅंकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. नागरी व सहकारी बॅंकांच्या आयकरातील जाचक तरतुदीचा ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार पुढाकार घेणार असल्याची माहिती वाशीम अर्बन बॅंकेचे अध्यक्ष व विदर्भ अर्बन को. ऑप. बॅंकस् असोसिएशनचे संचालक सुभाष राठी यांनी दिली.
नागरी व सहकारी बॅकांचा आयकरातील जाचक तरतुदींचा ज्वलंत प्रश्न आहे. नागरी सहकारी बॅंकांना इतर बॅंकांप्रमाणेच आयकर लागू झाला, पण व्यापारी बॅंकांचे अनुत्पादक कर्जावरील वसूल न झालेले व्याज करपात्र उत्पादनात धरले जात नाही. ही तरतुद नॉन शेडय़ुल्ड सहकारी बॅंकांसाठी नाही. या तफावतीमुळे नागरी सहकारी बॅंकांवर कोटय़वधी रुपयाची आयकराची थकबाकी आयकर खात्याने काढली आहे. त्यावर बाधित बॅंका सर्व पातळ्यांवर लढत आहेत. आयकर खात्याने काही बॅंकांकडून सक्तीने पसेही भरून घेतले आहेत. वेगवेगळ्या समस्यांने ग्रस्त सहकारी बॅंकांना या अन्यायामुळे संघर्ष करावा लागत आहे. भारतातील एकूण नागरी सहकारी बॅंकांपकी ९७ टक्के बॅंका नॉन शेडय़ुल्ड आहेत. त्यांच्या हितसंरक्षणासाठी आयकर कायद्यात योग्य ती दुरुस्ती करून त्यांच्यावर आयकर आकारताना इतर व्यापारी बॅंकांप्रमाणेच तरतुदीचा लाभ मिळायला पाहिजे, ही शिष्टमंडळाची भूमिका वित्त मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांनी मान्य केली आणि यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या बठकीत नागरी सहकारी बॅंकांवर रिझर्व बॅंकेच्या नवीन र्निबधावर चर्चा झाली. हे र्निबध सहकार चळवळीवर आघात करीत आहेत. या प्रश्नावर शरद पवार यांनी रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबईत उच्चस्तरीय बठक लवकरच घेणार असल्याचे सांगितले.
या शिष्टमंडळात माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार आनंदराव अडसूळ, महाराष्ट्र फेडरेशन ऑफ अर्बन को. ऑप. बॅंकेचे संचालक गुलाबराव शेळके, शोभा सावंत, बापुसाहेब पुजारी, कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष शशीकांत बुगदे, फेडरेशनच्या मुख्याधिकारी सायली भोयर आणि वाशीम अर्बन बॅंकेचे अध्यक्ष सुभाष राठी उपस्थित होते.