इंदिरा सह. सूतगिरणीच्या कामगार प्रतिनिधींच्या निवडणुकीत ‘सिटू’चे वर्चस्व Print

वर्धा/प्रतिनिधी
येथील इंदिरा सहकारी सूतगिरणीच्या अटीतटीच्या ठरलेल्या कामगार प्रतिनिधींच्या निवडणुकीत ‘सिटू’प्रणित आघाडीने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.माजी मंत्री प्रमोद शेंडे प्रवर्तक असलेल्या इंदिरा सूतगिरणीत कामगार प्रतिनिधी हा पूर्वीपासूनच कळीचा मुद्या ठरलेला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीपासून कामगार नेते श्याम गायकवाड यांचे गिरणीच्या कामगारांमध्ये प्रभूत्व होते, पण काही वर्षांत माकपच्या ‘सिटू’ या कामगार संघटनेने कामगारांचा विश्वास संपादन करीत वर्चस्व स्थापन केले.
‘सिट’ूचे नेते यशवंत झाडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे बंडू बळीराम साटोणे, सुमेरसिंग गोविंदसिंह ठाकूर, रामभाऊ कान्होजी ठावरी, रवींद्र विठोबा राऊत, रवींद्र रामाजी भलमे हे बहुमताने निवडून आले. त्यांनी घनश्याम बोरकर यांच्या नेतृत्वाखालील कामगार विकास मंचच्या सर्व उमेदवारांचा पराभव केला. गिरणीतील ५०६ कामगारांपैकी ४७० कामगारांनी मतदान केले. कामगार अधिकारी धुर्वे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीनंतर ‘सिटू’चे जिल्हाध्यक्ष यशवंत झाडे, भया देशकर, महेश दुबे, सीताराम लोहकरे यांनी कामगारांना संबोधित केले. यावेळी सर्व कामगारांना कायद्याप्रमाणे ८.३० टक्के हिवाळी बोनस मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
कामगारांनी ‘सिटू’मध्ये सदस्य नोंदणी करावी. संघटना मजबूत करून आपले हक्क मिळवून द्यावे, असे आवाहन करण्यात आले. जानराव नागमोते, सुनील घिमे, संजय भोयर, विष्णू उईके, सुरेश फ टिंग, प्रमोद बुधबावरे, पांडुरंग आदमने, किशोर गोटे, दिनकर सपकाळ, किशोर कुबडे आदींनी विजयासाठी योगदान दिले.