४९ शासकीय धान खरेदी केंद्रे भंडारा जिल्ह्य़ात सुरू Print

भंडारा/वार्ताहर
जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचे धान-पीक मळणी करून विक्रीसाठी तयार आहे. सण-उत्सवाच्या काळात शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीत धान विकावा लागू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ जिल्ह्य़ात एकूण ४९ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हा पणन अधिकाऱ्यांना दिले.
 यावर्षीपासून शासनाने धानाची किमान आधारभूत किं मत वाढवून १२५० रुपये केली आहे. अ दर्जासाठी १२८० व ब दर्जासाठी १२५० रुपये या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीत धान विकू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. धान खरेदी केंद्रावर किमान १२५० रुपये यापेक्षा कमी किमतीत धान खरेदी केल्यास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे २५२३०९, २५१२२२ व १०७७ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
 तसेच अ दर्जाचे धान जाहीर केलेल्या दरानेच खरेदी करण्याचे निर्देश सर्व धान खरेदी केंद्रांना त्यांनी दिले. आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत धान खरेदी केल्यास त्या सहकारी संस्थेवर दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी पणन अधिकाऱ्यांना केली. धान खरेदी प्रक्रियेवर जिल्हा पणन अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांनी नियंत्रण ठेवणार आहेत. भंडारा तालुक्यात भंडारा, वरठी, मिटेवाणी, बेलगाव, बघेडा, कांद्री, वाकेश्वर, आमगाव या केंद्रांवर धान खरेदी सुरू करण्यात आली आहे.
 मोहाडी तालुक्यात मोहाडी, पालेरा, डोंगरगाव, तुमसर तालुक्यात तुमसर, नाकाडोंगरी, डोंगरी, वाहनी, चुल्हाड, आष्टी, देवसर्रा, मिटेवाणी, चिचोली, हरदोली या ११ केंद्रांवर लाखनी तालुक्यात लाखनी, जेवनाळा, पालांदूर, पिंपळगाव, मुरमाडी, तुप लाखोरी, पोहरा या ठिकाणी, साकोलीमध्ये साकोली, विरसी, सानगडी, निलजगोड, लाखांदूर तालुक्यात मासळ, लाखांदूर, दिघोरी, बारव्हा, पारडी, डोकेसरांडी, सरांडी बुज, हरदोली, पुयार, पवनी तालुक्यात पवनी, अडय़ाळ, कोंढा, आसगाव, चिचाळ ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अधिकृत धान खरेदी केंद्रावरच धान विक्रीसाठी न्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.