हिंदू धर्मातूनच सुदृढ राष्ट्रनिर्मिती शक्य’ Print

गोंदिया/वार्ताहर
रा. स्व. संघाचे कार्य हिंदूच्या संघटनेसाठी सुरू आहे. हिंदू धर्म म्हणजे काय? या तर भूमीवर राहणारे जे व्यक्ती त्या भूमीला मातृभूमी मानतात, ज्यांना त्या भूमीचा इतिहास आपला वाटतो, तसेच त्या भूमीतील सांस्कृतिक जीवनमूल्ये समान वाटणाऱ्यांचे संघटन म्हणजे हिंदू होय. अशा हिंदू धर्मातूनच सुदृढ राष्ट्राची निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सुभाष स्कूल मदानात आयोजित शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदेवरा ट्रस्टचे अध्यक्ष दिनेशभाई पटेल, जिल्हा संघचालक फिनद्र बिसेन, नगरसंघचालक राम टोळ, नगरसहसंघचालक दिनेशभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मा.गो. वैद्य म्हणाले की, रा. स्व. संघ हा हिंदूंच्या संघटनासाठी कार्य करत आहे. देशाचे भविष्य हिंदूंशी जुळले आहे. हिंदूंचा विजय हा देशाचा विजय, तर हिंदूंचा पराभव हा देशाचा पराभव ठरतो. राष्ट्राचे भाग्य हिंदूसोबत जुळले गेले आहे. हे हिंदू कोणत्याही धर्माला वा पंथाला मानणारे असू शकतात. हिंदू हा समाज असून समाजातूनच राष्ट्रनिर्मिती होते. अनेक जण हिंदू धर्माला एका विशिष्ट पंथाशी जोडून संकुचित करण्याचा प्रयत्न करीत असतात; परंतु हिंदू संप्रदाय व पंथ हे धर्माचे अंग आहे. त्यामुळे या धर्माची व्यापकता मोठी आहे.
धर्माविषयी बोलताना ते म्हणाले की, जे व्यक्ती धर्माचे आचरण करतात. जसे ज्या भूमीवर आपले वास्तव्य आहे त्या भूमीला आपण मातेसमान मानून ‘वंदेमातरम’  ची भावना जोपासणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी इस्त्रायलचे उदाहरण दिले. इस्त्रायलचे तुकडे होऊन १८०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी होऊनही तेथील लोक जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असले तरी जेरूसलेमला विसरले नाही. इतकेच नव्हे, तर त्यांनी आपल्या मातृभाषेलाच राष्ट्रभाषा मानली; परंतु आपल्या देशाचे तुकडे होऊन शंभर वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपण लाहोर व ढाका विसरल्याची खंत वाटते. तसेच ज्या व्यक्तींना मातृभूमीच्या इतिहासाविषयी आपुलकी वाटते. जसे लंकेत रामाचा विजय, कुरूक्षेत्रात पांडवांचा विजय या घटना माणसाला आनंदित करतात, तर पानीपतमध्ये मराठय़ांचा पराभव, हल्दीघाटीत राणा प्रतापांचा पराभव यासारख्या घटना माणसाला दुखी करतात. अशा इतिहासाविषयी जिव्हाळा बाळगणारी व्यक्तीही धर्माचे पालन करणारी ठरते. तसेच ज्यांना या भूमीतील जीवनमूल्ये आपली वाटतात. ज्यांचे चांगल्या व वाईट घटनांविषयी मापदंड समान असतात. चांगली जीवनमूल्ये प्रस्थापित करणारे ज्यांचे आदर्श असतात, अशा व्यक्तीही धर्माचे पालन करणारे ठरतात. जे व्यक्ती राष्ट्र, इतिहास व जीवनमूल्य यांचे कटाक्षाने पालन करते तेच खरे हिंदू ठरतात. त्यामुळे असे हिंदूच खरी राष्ट्रनिर्मिती करू शकतात.
अध्यक्षीय भाषणात दिनेशभाई पटेल म्हणाले, ८५ वर्षांपासून समाजहितासाठी रा. स्व. संघाचे कार्य सुरू आहे. विविध भाषा, विविध जाती, विभाग असतानाही संघाच्या माध्यमातून सर्वाना संघटित करून राष्ट्रभक्ती जागविण्याचे कार्य सुरू आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून भारतमाता, शिवाजी महाराज, गुरूगोिवदसिग यांच्या प्रतिमेचे पूजन व शस्त्रपूजनाने झाली. यापूर्वी स्वयंसेवकांनी पथसंचलन करून सलामी दिली. कार्यक्रमाचे संचालन विनय नखाते व प्रास्ताविक व आभार बाळकृष्ण बिसेन यांनी मानले. यावेळी मोठय़ा संख्येने मान्यवर व नागरिक उपस्थित होते.