लोकसभा निवडणुकीसाठी मेघे पितापुत्रांचे तळ्यात मळ्यात Print

वर्धा / प्रतिनिधी
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या व्यापक विस्तारामागे आगामी लोकसभा निवडणूकीचे संदर्भ दिले जात असण्याच्या पाश्र्वभूमीवर वर्धा लोकसभा मतदारसंघातही उमेदवारीचे पडघम वाजणे सुरू झाले असताना मेघे पिता-पुत्रांचे ‘तळयात की मळयात’ सुरू असल्याचे दिसून येते.
सर्वच राजकीय पक्षांनी आगामी २०१४ च्या निवडणुकीची पडद्याआड तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा झालेला विस्तार व राज्यातही मंत्रिमंडळाच्या फे रबदलाचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संकेताचे तेच कारण दिले जाते. वर्धा लोकसभा क्षेत्रातही या निवडणुकीचे पडघम मंदस्वरात उमटतात. काँग्रेसचे विद्यमान खासदार दत्ता मेघे यांनी गतवेळच्या निवडणुकीत आपली ही शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर घोषित केले होते. मात्र राजकीय वर्तुळाने त्यावेळी व नंतरही मेघेंच्या घोषणेला गांभीर्याने घेतले नव्हते. सहा महिन्यांपूर्वी पुन्हा उभे राहण्याची तयारी असल्याचे सांगणाऱ्या मेघेंनी अपेक्षित असा अनुभव दिला.
गत तीन महिन्यापूर्वीपासून मेघेंचे वक्तव्य ९० अंशाच्या कोणात फि रले. कारण त्यांचे पूत्र सागर मेघे यांचे नाव आता चर्चेत आहे. खा. मेघेंना याविषयी विचारणा केल्यावर ते म्हणाले की हे खरे आहे. सागरचेच नाव माझ्या डोळयापुढे आहे. त्याचा अद्याप स्पष्ट होकार नाही. मात्र तो किंवा त्याने स्पष्टच नाकारल्यावर समीर मेघेचे नाव पक्षश्रेष्ठींना सुचवू. श्रेष्ठींचा जर मलाच उभे राहण्याचा आदेश झाला तर मग नाईलाच आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मी माझे नाव पुढे करण्यास कचरत आहे. काँग्रेस पक्ष महत्वाचा. पक्षाचा आदेशच शिरसावंद्य मानू. पक्षासाठी सागर हा एक चांगला उमेदवार होऊ शकतो, हे मात्र निश्चित. असे मेघेंनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
अभिमत विद्यापीठ व ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून मेघेंनी उभा केलेला जनसंपर्क चांगलाच आहे. जिल्ह्य़ाच्याच नव्हे तर लोकसभा क्षेत्रातल्या मोर्शी-चांदूर भागात संस्थेच्या रूग्णवाहिका अहोरात्र सेवा देत आहेत. गणेश फे स्टिव्हल व अन्य उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा सावंगीच्या मेघे प्रासादात वापर राहतो. संकटग्रस्तांचे समाधान करण्याचे मेघे पिता-पुत्रांचे कौशल्य वादातीत आहे. पण खासदार मेघेंपेक्षा त्यांचे पुत्र सागर मेघेंविषयी शब्दाचा एकदम पक्का म्हणून झालेला परिचय उमेदवारीसंदर्भात विशेष चर्चिला जातो. रणजित कांबळे व प्रा. सुरेश देशमुख यांच्याशी असलेल्या कट्टर राजकीय वैराची जाणीव मेघेंनाही आहे. हे दोन बलाढय गट समजले जातात. मेघेंना अपशकून करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाही.
गतवेळी प्रभा रावांची कन्या चारूलता टोकस यांचे नाव मेघेंच्या स्पर्धेत होते. यावेळीही ते राहणार. मेघेंचे गॉडफोदर असणाऱ्या विलासराव देशमुखांच्या जाण्याने श्रेष्ठीपातळीवरील रदबदली महत्वाची ठरली आहे. चारुलता टोकस यांचा आईच्या काळापासून दिल्लीदरबारी असणारा वावर यावेळी कामात येण्याची शक्यता वर्तविल्या जाते.भाजपला या क्षेत्रात विजय सोपा ठरणारी ही उमेदवारी असेल, असा मेघे सर्माकांचा टोला नेहमीच असतो.
पक्षांतर्गत विवादापेक्षा आज मात्र दत्ता मेघे की सागर मेघे, हाच कॉग्रेस वर्तुळाचा उत्सुकतेचा भाग आहे. मेघेविरोधक तर सागरच्या उमेदवारीसाठी नागपूर व अन्य ठिकाणाहून वध्र्यात आलेल्या त्यांच्या हितचिंतकांद्वारे सुरू चाचपणीचा नावानिशी संदर्भ देत आहे. सागर मेघेंची वध्र्यातील नियमित हजेरी, सुस्वभाव व पित्यापेक्षा शब्दाचा पक्का असा लौकिक त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत बळ देणारा ठरत आहे. आता सागर मेघे आस लावून बसलेल्यांचा विचार करीत उमेदवारीसाठी तयार होणार काय? हाच प्रश्न आहे. त्यामुळे तळयात की मळयात, असे काहूर उठल्याचे दिसून येते.