अकोला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात? Print

ऑगस्टपासून कर्मचाऱ्यांना पगार नाही
अकोला / प्रतिनिधी
alt

गेल्या तीन महिन्यांचा पगार देण्यासाठी महापालिकेजवळ पुरेसा निधी नसल्याने दोन हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारचे अकोला महापालिकेकडे दुर्लक्ष असून येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे महापालिकेचे कामकाज विस्कळीत झाले आहे. महान येथील वीज पुरवठा महावितरण कंपनीने सोमवारी खंडित केला होता. आज महापालिकेने पैशांचा भरणा केल्याची माहिती मिळाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला नाही. आयुक्त दीपक चौधरी यांनी महापालिका कर्मचाऱ्यांचे थकित वेतन तत्काळ देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
अकोला महापालिकेचा खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, अशी अवस्था आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा महान येथील जलशुध्दीकरण केंद्रातून होतो. येथील विजेचे २१ लाख रुपयांचे देयक थकित होते. त्यामुळे महावितरण कंपनीने महान येथील वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने महावितरण कंपनीचे २१ लाख रुपये देणे शक्य नसल्याची माहिती मिळाली. या २१ लाखांपैकी महापालिकेने १९ लाख रुपयांचा भरणा आज केला. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुढील एक महिना सुरळीत राहण्याची शक्यता आहे. महापालिका हद्दीत अनेक पथदिवे विजेचे देयक अदा न केल्याने बंद आहेत.
दिवाळीच्या तोंडावर महापालिका कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या तीन महिन्यांचा पगार होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधार जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. हा सर्व प्रकार गंभीर असून महापालिकेचे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असल्याचे चित्र स्पष्ट करते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकित असताना कर्मचारी संघटनांची चुप्पी का, असा प्रश्न सामान्य कर्मचारी सर्वत्र विचारत आहेत. कर्मचारी संघटनांबरोबर विरोधकांची या मुद्यावर चुप्पी असल्याने कर्मचाऱ्यांच्या प्रश्न गंभीर होत आहे. महापालिकेतील विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे राज्य सरकारने त्वरित भरण्याची गरज असताना राज्य सरकारचे अकोल्याकडे लक्ष नसल्याचे दिसते. दरम्यान, महापालिका आयुक्त दीपक चौधरी यांनी निधी उपलब्ध झाल्याबरोबर दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाईल, अशी माहिती दिली.
शहरात अनावश्यक ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम व सव्‍‌र्हिस लाईनमध्ये काँक्रीटीकरण यासारख्या योजनांच्या माध्यमातून महापालिकेच्या निधीचा सर्रास दुरुपयोग होताना दिसतो. महापालिका पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयांची रंगरंगोटी व सुशोभिकरण करून बराच पैसा खर्च केल्याची माहिती मिळाली. विरोधकांची ओरड महापालिकेत कमी झाल्याने नागरिकांच्या समस्या जशाच्या तशाच आहेत. दिवाळीच्या तोंडावर शहरातील स्वच्छता मोहीम आखण्याची गरज असताना त्याचे कुठलेही नियोजन नाही. आरोग्य विभागाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याने शहरातील रुग्णांची संख्या वाढत आहे. अकोला शहर हे समस्यांचे माहेरघर होताना दिसत आहे. कर्मचारी व जनतेचा रोष वाढल्यास त्याचा उद्रेक होण्याची चिन्हे निर्माण होत आहेत.