संक्षिप्त Print

‘जिनीअस २०१२’मध्ये माऊंट कार्मेल अव्वल
चंद्रपूर / प्रतिनिधी- रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्यावतीने गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेली अभ्यासावर व सामान्य ज्ञानावर आधारित ‘जिनीअस २०१२’ स्पध्रेची अंतिम फेरी प्रियदर्शिनी सभागृहात झाली. या बक्षीस वितरण सोहळ्याला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, प्रसिद्ध शैक्षणिक कौन्सिलर झाकीर हुसेन, माजी निवासी जिल्हाधिकारी शफीक अहमद, इंटरॅक्ट क्लबच्या अध्यक्ष टोबी उपस्थित होत्या. या स्पध्रेचे प्रथम बक्षीस १० हजार रुपये माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट व हायस्कूलच्या साक्षी झा, केतन खंडे व वैष्णवी सरदेशपांडे या टीमने, द्वितीय बक्षीस ७ हजार रुपये भवानजीभाई चव्हाण शाळेच्या हितेश सोमनाथे, पायल पटले व सचिन गेडाम या विद्यार्थ्यांच्या चमूने, तर तृतीय क्रमांक चांदा पब्लिक शाळेचे विवेक राऊत, ऋतुजा पडगेलवार व नमस्वी मल्ला या विद्यार्थ्यांच्या चमूने ५ हजार रुपये बक्षीस प्राप्त केले. या स्पध्रेत शहरातील २६ शाळा सहभागी झाल्या होत्या. सर्व शाळांना स्मृतिचिन्हे, सर्व  सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. या स्पध्रेतील १० हजार रुपयाचे प्रथम बक्षीस सेवाराम गुलानी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे चिरंजीव ललित गुलानी यांच्यातर्फे देण्यात आले, तर दुसरे बक्षीस ७ हजार व तृतीय ५ हजार रुपये आनंद नागरी सहकारी बँकेतर्फे देण्यात आले. या प्रकल्पाचे प्रा. योगेश दुधपचारे, स्मिता ठाकरे, संचालिका स्मिता जीवतोडे, मनीषा पडगिलवार यांनी कार्यभार सांभाळला.
भामसंचे जिल्हा अधिवेशन ४ नोव्हेंबरला
 स्थानिक भारतीय मजदूर संघाचे त्रवार्षिक जिल्हा अधिवेशन ४ नोव्हेंबरला येथील महेश भवनात आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन महामंत्री भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेशचे अशोक भुताड करणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक जिल्हाध्यक्ष मजदुर संघ शैलेश मुंजे, तर प्रमुख पाहुणे आमदार सुधीर मुनगंटीवार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती रमेश पाटील, सुरेश देशपांडे, राम बाटवे, अनिल बंडीवार, संदीप आवारी यांची प्रमुख उपस्थिती असेल. स्वागताध्यक्ष स्थानिक उपमहापौर व शिवसेना महानगर अध्यक्ष राहतील. यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय मजदूर संघाने केले आहे.
‘गोष्ट लाख मोलाची’चे थाटात उद्घाटन
रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व इंटरॅक्ट क्लब ऑफ मातोश्री विद्यालय यांच्या वतीने मातोश्री विद्यालयात ‘गोष्ट लाख मोलाची’ या लघुनाटिकेचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार नाना श्यामकुळे, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० चे असिस्टंट गव्हर्नर रोटे शफीक अहमद, रोटरी क्लबच्या अध्यक्ष डॉ. रेखा दांडेकर, सचिव महेश उचके, प्रकल्प इंचार्ज सचिन गांगरेड्डीवार, मातोश्री विद्यालयाचे मुख्याध्यापक खनके, या लघुनाटिकेचे दिग्दर्शक संजय पेंडसे प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात शांताराम पोटदुखे यांनी रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचा अशा प्रकारच्या लघुनाटिकेच्या निर्मितीबाबत उपक्रम राबवल्याबद्दल अध्यक्ष डॉ. रेखा दांडेकर यांचे अभिनंदन केले. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हात धुणे, वाढलेल्या नखांची काळजी घेणे, कुठेही थुंकणे, कचरा टाकणे आदी दैनंदिन व्यवहारातील छोटय़ा गोष्टींकडे लक्ष देऊन त्याबद्दल जागरूक राहणे हा या लघुनाटिकेचा उद्देश होता. संचालन अजय पालारपवार यांनी तर  आभार धर्मपुरीवार यांनी मानले.  
आचार्य कोंडा लक्ष्मण बापू यांना श्रद्धांजली
राजुऱ्याचे पहिले आमदार दिवं. आचार्य कोंडा लक्ष्मण बापू यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोलाचे कार्य केले. त्यांचा स्वातंत्र्य लढय़ात मोलाचा वाटा असून ते नेहमी संघर्षमय जीवन जगले, असे उद्गार आमदार सुभाष धोटे यांनी काढले. राजुरा तालुका काँग्रेस समिती व शहर काँग्रेस समितीतर्फे आयोजित गांधी भवनात झालेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार विठ्ठल धोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष स्वामीजी येशेलवार, सश्वावत अली, अ‍ॅड. सदानंद लांडे, पांडुरंग कोंडावार, साईनाथ बतकमवार, मनोज तेलीवार, हेमंत झाडे उपस्थित होते. माजी आमदार विठ्ठल, दादा लांडे, प्रा. विजय आकनुरवार, डॉ. सुरेश उपगन्लावार, किसन वाटेकर, महादेव वाटेकर, वासुदेव कुचनवार आदींची त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. कार्यक्रमाला नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
शहीद बाबुराव शेडमाके यांना वंदन
जिल्हा कारागृह परिसरात शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे स्मारक उभारण्याची मागणी भाजपचे महानगर सरचिटणीस किशोर जोरगेवार यांनी केली. शहीद दिनी सामाजिक समरसता मंचच्या वतीने क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांना वंदन करत अभिवादन रॅली काढली.  किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र वाहून त्यांना आदरांजली वाहिली. शहीद बाबुरावजींचे भव्य स्मारक कारागृहात बांधण्याची मागणी करण्याचे पत्र आपण राज्य शासनाकडे पाठवले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून आपण या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. क्रांतिवीर बाबुराव  शेडमाके यांचे टपाल तिकीट प्रकाशित करण्यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी राज्य व केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करून टपाल तिकीट प्रकाशित करण्यास भाग पाडले.
मेमरी व व्यक्तिमत्त्व विकासाची कार्यशाळा
सरदार पटेल महाविद्यालयात मेमरी व व्यक्तिमत्त्व विकासाची कार्यशाळा थाटात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भरत पोटदुखे उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जे.ए. शेख, विकास रामटेके उपस्थित होते. या कार्यशाळेत विकास रामटेके यांनी अनेक प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण बाहेर काढण्याचा प्रयास केला. तीन तास चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी अनुभवाची उदाहरणे प्रत्यक्षात बघितली. माणसाच्या शरिरातच सर्वच गुण संपन्न करणारी केंद्रे असतात. मात्र जो त्यांचा वापर योग्य करतो तोच पुढे जातो, हा संदेश विद्यार्थ्यांना मिळाला.  संचालन प्रा. प्रशांत ठाकरे यांनी, तर आभार प्रा. आशीष जांबुतर यांनी मानले.
सरदार पटेल महाविद्यायात कार्यशाळा
येथील सरदार पटेल महाविद्यायात व्यक्तिमत्च विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भरत पोटदुखे होते. यावेळी वक्ते विकास रामटेके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून व्यक्तिमत्व विकासाचे महत्व पटवून दिले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे. ए. शेख यांनी केले. संचालन प्रा. प्रशांत ठाकरे यांनी, तर आभार प्रा. आशिष जांबुतर यांनी मानले. कार्यक्रमाकरिता कनिष्ठ विभागातील प्राध्यापकांनी सहकार्य केले.
महाकाली मंदिर परिसरात रावण दहन
यावर्षीही सार्वजनिक राष्ट्रीय शारदा व दसरा महोत्सव मंडळाच्या वतीने महाकाली मैदानावर महाकाली मंदिर परिसरात रावण, कुंभकर्ण व मेघनाथ यांच्या विशाल पुतळ्यांचे दहन विधी कार्यक्रम फटाक्याच्या भव्य आतषबाजीने, रोषणाईने थाटात पार पडला. अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेश पुगलिया, तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर संगीता अमृतकर, संतोष लहामगे, एकता गुरले, दुर्गेश कोडाम, देविदास गेडाम, प्रवीण पडवेकर, अशोक नागपुरे, गोपाळ अमृतकर उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष लहामगे यांनी केले. संचालन किशोर करपे यांनी, तर आभार जयेश वऱ्हाडे यांनी मानले.