शाळेत रुजू करून घेण्यास टाळाटाळ Print

शिक्षकाचा आत्मदहनाचा इशारा
भंडारा /वार्ताहर
शिक्षण सेवक म्हणून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर सेवा समाप्त करून रुजू करून घेण्यास नकार देत आपल्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप जवाहरनगर कोंढी येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळेतील शिक्षक राहुल महाजन यांनी केला आहे. आपल्याला शाळेत रुजू करून सेवा सुरळीत न केल्यास आंदोलन करू, असा इशाराही महाजन यांनी यावेळी दिला.
मुख्याध्यापक आणि संस्थाचालक आपल्याला रुजू करून घेण्यास तयार नसल्याचे सांगताना शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाचीही अवहेलना करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोंढी येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळेत तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम केल्यानंतर आता आपल्यावर संस्थेकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप करीत आपली बाजू मांडण्यासाठी शिक्षक राहुल महाजन यांनी शनिवार,२७ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषदेत महाजन म्हणाले की. शिक्षण सेवकपदावरील माझी नियुक्ती  भटक्या जातीमधून शिक्षण सेवक म्हणून जवाहरनगर येथील कोंढी ग्रामविसाक पूर्व माध्यमिक  शाळेत करण्यात आली. १ ऑक्टोबर २००९ ते ३० सप्टेंबर २०१२ असा शिक्षण सेवक म्हणून माझा कालावधी होता. संस्थेत कामावर घेताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार मी अमरावती विभागातील असल्याने त्यांच्याकडे माझा प्रस्ताव पाठविला गेला.
शिक्षण सेवक असतानाच माझे जातवैधता प्रमाणपत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना मिळाले, मात्र ते मुख्याध्यापकांनी स्वीकारले नाही व माझी सेवा हेतुपुरस्परपणे समाप्त करण्यात आली.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जातवैधता प्रमाणपत्राचे कारण पुढे करून मान्यता रद्द केली. यावर शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देऊन रद्द करण्याचा, तसेच मुख्याध्यापकांना आपल्याला रुजू करून घेण्यासंदर्भात सूचना करण्याचे र्निदेश दिले, मात्र त्यानंतरही आपल्याला शाळेत रुजू करून घेण्यात येत नसल्याचा आरोप महाजन यांनी पत्रकार परिषदेत  केला आहे.
संस्थेत शिक्षण सेवक म्हणून लागल्यापासून आपल्याला संस्था पदाधिकाऱ्यांकडून अनेकदा दारू आणि मटणाची पार्टी मागण्यात आली. माझ्यासोबत लागलेल्या एका शिक्षिकेलाही पार्टी मागितली गेली. त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली, मात्र माझी परिस्थिती हलाखीची असल्याने आपण त्यांची इच्छा पूर्ण करू शकलो नाही.
या उदाहरणावरून हे पुरेसे स्पष्ट होते की केवळ हेतूपुरस्पर माझ्यावर अन्याय करण्यात येत आहे. आपल्याला शाळेत रुजू करून सेवा सुरळीत न केल्यास आंदोलन करू, असा इशाराही महाजन यांनी यावेळी दिला.