वाळू चोरीप्रकरणी एकास अटक, चार ट्रॅक्टर्स व जेसीबी मशिन जप्त Print

गोंदिया /वार्ताहर
वाळूच्या तस्करीविरोधात देवरीचे उपविभागीय अधिकारी द्विवेदी यांनी राबविलेल्या मोहिमेदरम्यान कोहमारा वाळूघाटावरून वाळूची चोरी करताना वसंत गहाणे यांच्या मालकीचे चार ट्रॅक्टर व एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आले. या प्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी वसंत गहाणे यांना अटक केली.
देवरी व सडक अर्जुनी तालुक्यातील वाळूघाटावरून मोठय़ा प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक सुरू होती, मात्र याकडे स्थानिक महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. वाळूच्या चोरटय़ा वाहतुकीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. याची दखल घेत देवरीचे उपविभागीय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी १८ ऑक्टोबरपासून धडक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा वाळूघाटावरून वाळूची चोरी करीत असताना वसंत गहाणे यांच्या मालकीचे चार ट्रॅक्टर्स व एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आली तसेच द्विवेदी यांनी या प्रकरणी वसंत गहाणे यांच्यावर दीड लाखांचा दंडह आकारला. यापकी एक तृतीयांश रकमेचा भरणा गहाणे यांनी सडक अर्जुनी येथील तहसीलदारांकडे केला होता.
 उपविभागीय अधिकारी द्विवेदी यांनी वसंत गहाणे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार अलका शिंगाडे यांना दिले होते. याचीच दखल घेत अलका शिंगाडे यांनी वाळूघाटावरून अवैधरीत्या वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी तलाठी पटले यांच्यामार्फत डुग्गीपार पोलीस ठाण्यात वसंत गहाणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची डुग्गीपारचे ठाणेदार सचिन पाटील यांनी दखल घेत वसंत गहाणे यांना काल दुपारी ४ वाजता अटक केली. त्यांच्यावर अवैध वाळूचोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला.
अवैध वाळू चोरी प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.