द्राक्षाची व्युत्पत्ती भारतातच -डॉ. स्टीव्ह मॅन्चेस्टर Print

भंडारा / वार्ताहर
द्राक्ष, कोरमस व बोर या प्रजातींची व्युत्पत्ती युरोपात झाली, असे आजपर्यंत समजले जात होते, परंतु या प्रजातींचे जीवाश्म दख्खनच्या पठारावर आढळून आलेले आहेत. या संशोधनावरून ६५ दक्षलक्ष वर्षांपासून या वनस्पतींचे अस्तित्व येथे होते. द्राक्षांची व्युत्पत्ती  युरोपात नव्हे तर भारतातच झाली आहे, असे प्रतिपादन फ्लोरिडा म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, फ्लोरिडा विद्यापीठाचे क्युरेटर डॉ. स्टीव्ह मॅन्चेस्टर यांनी केले.
जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या विभागाचे प्रमुख डॉ. डी. के. कापगते यांच्यासमवेत डॉ. स्टीव्ह मॅन्चेस्टर आंतरराष्ट्रीय प्रकल्पावर संशोधन करणार आहेत. या दौऱ्यात ते विदर्भ आणि मध्य भारतातील विविध स्थळांना भेट देऊन तेथे आढळलेल्या जीवाश्मांवर संशोधन करतील. वनस्पतीशास्त्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.
६५ दशलक्ष वर्षांपूर्वी भारत एक बेट होते. सततच्या पावसामुळे व उष्ण हवामानामुळे येथील जंगले सद्यस्थितीत आढळणाऱ्या कोकण किनारपट्टीसारखी होती. ताड, सुपारी, नायपा, नारळ, केवडा व सोनरीसिया यांचे जीवाश्म दख्खनच्या पठारावर विपुल प्रमाणात आढळतात.
त्यावरून आताची मुंबई जवळील
किनारपट्टी छिंदवाडय़ापर्यंत पसरलेली होती, असा निष्कर्ष आतापर्यंत काढण्यात आला आहे.
व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी. राव यांनी केले. प्रास्ताविक डॉ. डी. के. कापगते यांनी केले. आभार डॉ. ए.के. पेढेकर यांनी मानले.