पांढरकवडा पालिकेच्या निवडणुकीत त्रिकोणी लढत Print

यवतमाळ / वार्ताहर
पांढरकवडा पालिकेच्या १४ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत सदस्यपदाच्या १७ जागांसाठी ६८ उमेदवार उभे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघडी, तर सेना-भाजपची युती झाली आहे. किशोर तिवारी गटाने विकास आघाडी स्थापन करत स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी अनुक्रमे १३ व ४ उमेदवार उभे केले असून भाजपने १२ व सेनेने ४ उमेदवार उभे केले आहेत.
भाजपला वॉर्ड दोनमध्ये उमेदवारच मिळाला नाही. या निवडणुकीत विद्यमान नगराध्यक्ष काँग्रेसचे शंकर बडे, माजी नगराघ्यक्ष भाऊराव मडापे गुरुजी, तिवारी गटाचे अनिल तिवारी, सभापती भावेश बोरले, काँग्रेस बंडखोर मदन जिड्ढेवार, विकास आघाडीचे विनोद तिवारी यांनी ही निवडणूक फार प्रतिष्ठेची बनवली आहे.मनसेनेही ३ उमेदवार लढवले आहेत. पंधरा अपक्ष देखील मदानात आहेत. प्रभाग एकमध्ये  काँग्रेसचे शंकर बडे, काँग्रेस बंडखोर मदन जिड्ढेवार आणि स्वतंत्र विकास आघाडीचे सुभाष दरणे यांच्यात लढत आहे. प्रभाग दोनमघ्ये स्वतंत्र विकास आघाडीचे विनोद तिवारी व काँग्रेसचे साजिद शरिफ, अशी सरळ लढत आहे. प्रभाग चारमघ्ये विद्यमान शिक्षण सभापती काँग्रेस उमेदवार भावेश बोरले आणि किशोर तिवारी गटाच्या स्वतंत्र विकास आघाडीचे माजी नगराघ्यक्ष अनिल तिवारी यांच्यात सरळ सामना आहे.