शेगावातील परिस्थिती पूर्वपदावर Print

* ३० दंगेखोरांवर गुन्हे     
* तिघांना अटक
बुलढाणा/प्रतिनिधी
फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र टाकल्याच्या कारणावरून २९ ऑक्टोबर रोजी विशिष्ट धर्माच्या युवकांनी शहरातील शिवाजी चौकात दुकानांची तोडफोड केली. त्यामुळे शहरात काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील परिस्थिती काल पूर्वपदावर आली आहे. या घटनेप्रकरणी अमर काशेलानी या मुख्य आरोपीसह वसीम पटेल व अमजद खान यांना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली, तर काल मंगळवार आठवडी बाजार नेहमीप्रमाणे भरल्याने जनतेने समाधान व्यक्त केले.
या घटनेप्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात विविध कमलान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मो. अमीन मो.मजीद (४१, रा. शेगांव) यांच्या तक्रारीवरून अमर किशोर काशेलानीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
तर पोलीस निरीक्षक विजय पाटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी चौक ते शिवनेरी चौकापर्यंतच्या दुकानांची नासधूस करून वातावरण भयभीत करणे आदीबाबत आरोपी सहारा मोबाईल चालक मो. जुबैर, शे. अनिस शे. जिया,
सै. इम्रान, इसुब खान, अस्लमखान अब्बास खान,शेख इम्रान, शे. जाफर, परवेज खान युनूस खान, शे. रशीद शे.हारूण, शे.मुजाद्दीन शे. बिलाल यांच्यासह आणखी  १५ व्यक्तींविरुद्ध  शेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, सोमवारच्या घटनेला पोलीस प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुख रमेश पाटील उमाळे यांनी केला आहे.
जातीय दंगल घडवून आणून शेगांवची शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी गावाचे माजी नगराध्यक्ष सत्यनारायण व्यास यांनी केली.
नगर संघचालक बबन भुतडा यांनी शेगांवात अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी केली.