जिवती तालुक्यातील पंधरा गावे झाली टॅँकर मुक्त Print

पावसाचे पाणी अडवून चौदा बंधारे आणि खोदले शंभरावर बोअर
चंद्रपूर / प्रतिनिधी
alt

जिवती या आदिवासी तालुक्यातील बहुतांश गावात अपारंपारिक पध्दतीने पावसाचे पाणी अडवून चौदा बंधारे व शंभरच्या जवळ बोअर खोदून उन्हाळ्यात टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागणारी पंधरा गावे टॅंकर मुक्त केली. भूजल सर्वेक्षण आणि ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून हा यशस्वी प्रयोग राबविण्यात आलेला आहे.
अतिदुर्गम माणिकगड पहाडावरील जिवती तालुक्यात चिखली बुज., रेंगेगुडा व तुमरीगुडा ही तीन गावे समाविष्ट असून या गावामध्ये उन्हाळ्यात नेहमी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांना चाऱ्यांचा प्रश्न निर्माण होत होता. रेंगेगुडा व तुमरीगुडा या गावांना उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. यापैकी चिखली या गावात वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत मानव विकास कार्यक्रमांतर्गत नालाबांध, चर खोदणे यासारख्या उपाययोजना घेण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे याचा फायदा या गावातील शेतकऱ्यांना होऊन बऱ्याच अंशी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा सुटलेला होता. मानव विकास कार्यक्रम राबविण्यात येत असताना या गावातील गावकऱ्यांकडून मिळालेला प्रतिसाद व त्यांचा सहभाग बघून युनिसेफ पुरस्कृत बहुउद्देशीय पाणी वापर प्रकल्पासाठी गावांची निवड करण्यात आली. युनिसेफच्या चमूने या गावांना भेट देऊन गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चिखली बुज. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले. त्यानुसार या सर्व गावांच्या सभोवतालचा परिसर संपूर्ण सर्वेक्षण करून व या भागातील भूशास्त्रीय रचनेचा अभ्यास करून विस्तृत अहवाल तयार करण्यात आला.  या गावातील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्याकरिता डीपीडीसी अंतर्गत ७ बंधारे, एमआरईजीएसमध्ये ७ बंधारे, अशी एकूण १४ बंधाऱ्यांची कामे व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत एफएससी व बीबीटी या अपारंपरिक उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. मौजा चिखली बुज. या गावात एफएससी ही उपाययोजना घेण्यात आली. त्यात गावातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे ५० मीटर अंतरावर पूर्वेस २९ बोअर घेण्यात आले. त्यामुळे नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील पाण्याची पातळी ६ मीटरवरून ३ मीटर वाढून उन्हाळ्यात निर्माण होणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. रेंगेगुडा भाग एक या भागातील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर उन्हाळ्यात कोरडी पडत होती. त्यामुळे या गावास टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. त्यामुळे या ठिकाणी बीबीटी ही अपारंपरिक उपाययोजना घेण्यात आली. सार्वजनिक विहिरींचे दक्षिण पूर्व भागास नाल्याचे दिशेने ६५ बोर घेण्यात आले. त्यामुळे उपाययोजना पूर्ण होताच उन्हाळ्यात कोरडय़ा पडणाऱ्या सार्वजनिक विहिरींची पाण्याची पातळी एक मीटपर्यंत आली व गावांचा पिण्याचे पाण्याचा प्रश्न मिटला. टँकर बंद झाला.
रेंगेगुडा भाग दोन या भागात एकच हातपंप होता. ज्याची पातळी ४५ मीटरवर असल्याने तो बंद पडलेला होता. त्यामुळे या ठिकाणी हातपंप होता ज्याची पातळी ४५ मीटरवर असल्याने तो बंद पडलेला होता. त्यामुळे या ठिकाणी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होत होती. गावकऱ्यांना उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. या ठिकाणी एफएससी ही उपाययोजना घेण्यात आली. हातपंपाच्या पश्चिम भागात हातपंपापासून अंदाजे १०० मीटर अंतरावर ३२ बोअर घेण्यात आले. त्यामुळे येथील हातपंपाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन बंद असलेला हातपंप सुरू झाला. गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. टँकर बंद झाला. या गावांमध्ये एफएससी व बीबीटी या उपाययोजना राबविण्यासाठी ९ लाख रुपये खर्च झालेला असून हा खर्च राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि युनिसेफ मिळून या कार्यालयाचे भूवैज्ञानिकांनी परिश्रम घेऊन या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविलेला आहे.