मुख्य अभियंत्यांचे घर पाडले Print

महापालिका व महावितरणमधील संघर्षांचा परिपाक
अकोला / प्रतिनिधी
महावितरणच्या मुख्य अभियंत्यांच्या घरावर महापालिकेने अशी कारवाई केली.

वीज बिलाच्या थकबाकीमुळे महापालिकेचे पथदिवे व पाणी पुरवठाचा विद्युत पुरवठा महावितरणने खंडित केला. या कारवाईच्या विरोधात महापालिका आयुक्तांनी महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्याच्या घराच्या बांधकामाची परवानगी तपासली. ती नसल्यामुळे अखेर त्यांच्या घरावर महापालिकेने हातोडा चालविला. महापालिका व महावितरण कंपनी यांच्यातील या संघर्षांमुळे महावितरण कंपनीच्या गौरक्षण रोडवरील वसाहतीत मोठा तणाव निर्माण झाला होता.
अकोला महापालिकेने महावितरण कंपनीचा पथदिवे व पाणी पुरवठय़ाचे बिल थकविले होते. त्यामुळे महावितरण कंपनीने महान येथील पाणी पुरवठा संयत्र व पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. महापालिकेने निर्धारित रक्कम अदा केल्यावर तो सुरळीत केला गेला. महापालिकेवर झालेली कारवाई जिव्हारी लागल्याने महापालिकेने महावितरण कंपनीच्या गौरक्षण रोडवरील अधिकाऱ्यांचे बंगले व सदनिकांची तपासणी केली. यात महावितरण कंपनीचे अमरावती विभागाचे मुख्य अभियंता चंद्रशेखर येरमे यांच्या घराच्या बांधकामाची परवानगी नसल्याचा मुद्दा महापालिकेने समोर केला. त्यांना चोवीस तासाची नोटीस देऊन  खुलासा मागविला. हा खुलासा करण्यात महावितरण कंपनीचे अधिकारी अपयशी ठरले. घराच्या बांधकामाची परवानगी नसल्याचे लक्षात येताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी थेट हे निवासस्थान पाडण्याची कारवाई केली.
ही कारवाई महावितरण कंपनीच्या बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची माहिती मिळाली. महावितरण कंपनीने मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानाचे बांधकाम करताना परवानगी न घेणे व त्यांचे कागदपत्रे व्यवस्थित न ठेवल्याने ही अप्रिय कारवाई महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्याच्या निवासस्थानावर झाली. दरम्यान, या संदर्भात महावितरण कंपनीच्या बांधकाम विभागाचे प्रमुख सी.एच.महात्मे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद नाही. या कारवाई नंतर महावितरण कंपनीच्या सदनिका व अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली. यात अनेक त्रुटी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, महापालिकेने महावितरण कंपनीची पथदिव्यांची ऑगस्ट व सप्टेंबरची थकबाकी अदा केल्यावर काल पथदिव्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला गेला. या कारवाईमुळे महापालिका व महावितरण कंपनी यांच्यातील संघर्ष येत्या काळात वाढणार आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही कारवाई झाल्याची माहिती मिळाली.