‘मनसे ग्राम पंचायतीच्या निवडणुका लढवणार’ Print

वाशिम जिल्ह्य़ात नवीन सदस्य नोंदणीस प्रारंभ
वाशीम/ वार्ताहर
ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मनसे जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये मनसेची शाखा आहे त्या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणार असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  जिल्हा संपर्क अध्यक्ष नवीन आचार्य यांनी येथे रविवारी केला.
स्थानिक मणिप्रभा हॉटेलमध्ये आयोजित पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे, कृषी सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्ष ललिता चव्हाण, उपाध्यक्ष पुष्पा ससाने, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मालपाणी, ज्ञानेश्वर जाधव, मनविसेचे जिल्हाध्यक्ष आनंद गडेकर, मनसेचे तालुकाध्यक्ष विष्णू सावके, मनविसेच्या कारंजा शहर अध्यक्ष पुनम बंग आदि उपस्थित होते.
यावेळी नवीन आचार्य म्हणाले, मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील सुजलाम सुफलाम महाराष्ट्र बनविण्यासाठी ग्रामीण भागातील सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी मनसे कटीबध्द आहे. मनसेचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता यांचा समन्वय असल्यास निश्चितच आगामी ग्राम पंचायत निवडणुकीसह पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील जनता मनसेसोबत राहून ग्रामीण भागातील मनसेचे संघटन मजबूत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले
लोकांचे भले झाले पाहिजे या पक्षाच्या भूमिकेतूनच मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणूस केंद्र िबदू समजून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. आपण जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून वाशीम जिल्ह्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर संपूर्ण वाशीम जिल्ह्याचा दौरा करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या नोंदणीमध्ये वाशीम जिल्ह्यात २५ हजार नवीन सदस्य नोंदणी करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील मनसे, मनविसे आणि मनसे कृषी सेनेचे पदाधिकारी व कार्यकत्रे बहुसंख्येने उपस्थित होते.