आंध्रप्रदेशातून वाशीममध्ये येणारा आठ लाखांचा गुटखा जप्त Print

वाशीम/वार्ताहर
चोरटय़ा मार्गाने गुटखा विक्रीसाठी वाशीमच्या काळ्याबाजारात आणणारा ट्रक शुक्रवारी रात्री येथील स्थानिक गुन्हे शाखा व वाशीम शहर पोलिसांच्या पथकाने वाशीम-अकोला महामार्गावर पकडला. या गुटख्याची किंमत ८ लाख ४ हजार २४० रुपये असल्याची माहिती वाशीम शहर पोलीस ठाण्यात प्रभारी ठाणेदार परशुराम राठोड यांनी दिली.
राज्यात मागील दोन महिन्यांपासून गुटखा विक्रीला शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे हा काळाबाजार जिल्ह्य़ात सर्वत्र फोफावला आहे. जिल्ह्य़ातील गुटखा विक्री करणारे कथित व्यापारी आंध्रप्रदेशातून गुटख्याची तस्करी करत असल्याचे वृत्त आहे. या पाश्र्वभूमीवर गुटख्यांच्या पुडय़ांनी भरलेला ट्रक (क्र. एपी १३, डब्ल्यू-६७९८) हैदराबादवरून वाशीमला येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व वाशीम शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार परशुराम राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. शुक्रवारी रात्री हे पथक वाशीम-अकोला महामार्गावरील एका ढाब्याजवळ उपस्थित होते.
 हा ट्रक घटनास्थळी येताच पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात तब्बल ८ लाख ४ हजार २४० रुपयाचा गुटखा सापडला, तसेच गुटखा पुडय़ा लपवून ठेवण्याचे ११ लाख रुपयाचे इतर साहित्य व ५ लाख रुपये किं मतीचा ट्रक, असा एकूण २४ लाख ४ हजार २४० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक शेख नदीम शेख युसूफविरुध्द पोलिसांनी कारवाई करून त्याच्याविरोधात वाशीम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
शनिवारी आरोपी ट्रकचालकास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ट्रकचालकास गुरुवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.